पुणे : पुणे मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे पाऊल ‘महामेट्रो’ने उचलले आहे. दांडेकर पूल ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गांसह स्थानकांच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ने निविदाही मागविल्या. मात्र, पुणे महापालिकेने ऐन वेळी दांडेकर पूल चौकात उड्डाणपुलाचा प्रस्ताव दिल्याने या प्रकल्पाचा तिढा निर्माण झाला आहे. याच वेळी या चौकातून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गही (एचसीएमटीआर) प्रस्तावित असल्याने मेट्रो मार्गाच्या नियोजनात आता ‘महामेट्रो’ला बदल करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. त्यातील दांडेकर पूल ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गांच्या कामाला ‘महामेट्रो’ने गती दिली. हे दोन्ही मेट्रो मार्ग आणि त्यावरील स्थानकांच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ने २६ जून रोजी निविदा मागविल्या. यासाठी निविदा सादर करण्यास २४ ऑगस्टची मुदत होती. त्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही मार्गांचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू करण्याचे ‘महामेट्रो’चे नियोजन होते.

महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी दांडेकर पूल चौकात उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे ‘महामेट्रो’ला कळविले. त्यानंतर ‘महामेट्रो’ आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात येत असल्याचे महापालिकेने सांगितले. यामुळे ‘महामेट्रो’ने या निविदा प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ दिली. महापालिकेकडून उड्डाणपुलाचे नियोजन सुरू असून, त्यांच्याकडून अद्याप अंतिम आराखडा ‘महामेट्रो’ला देण्यात आलेला नाही. याच वेळी दांडेकर पूल चौकातून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग जात असल्याने त्यादृष्टीने मेट्रो मार्ग आणि उड्डाणपुलाचे नियोजन करावे लागणार आहे. हे नियोजन पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या दांडेकर पूल ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मार्गांचे काम लांबणीवर पडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अद्याप आराखडा नाही

दांडेकर पूल चौकात उड्डाणपूल उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे मेट्रो मार्गांसह स्थानकांच्या उभारणीसाठी सुरू करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. या बाबतचा अंतिम आराखडा महापालिकेकडून अद्याप मिळालेला नाही. हा आराखडा मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असे महामेट्रोचे संचालक (कार्य)
अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

दांडेकर पूल चौकात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे तिथे उड्डाणपूल उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याच ठिकाणहून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग जात असल्याने त्याचाही विचार उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गाच्या रचनेत करावा लागणार आहे. या उड्डाणपुलाचा आराखडा महिनाभरात तयार करून तो ‘महामेट्रो’कडे सादर केला जाईल, असे पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे यांनी सांगितले

प्रस्तावित उन्नत मेट्रो मार्ग

दांडेकर पूल ते खडकवासला
एकूण लांबी – ९.६७ किलोमीटर
स्थानके – ८

नळ स्टॉप ते माणिकबाग
एकूण लांबी – ७.२४ किलोमीटर
स्थानके – ६