Pune Metro Phase 2 expansion project status : ‘मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू असून, पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते भक्ती-शक्ती चौकापर्यंतचा विस्तार २०२७ अखेरपर्यंत आणि स्वारगेटपासून कात्रजपर्यंतचा विस्तार २०२९ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘वनाजपासून चांदणी चौकपर्यंतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, अडीच-तीन वर्षांमध्ये, तर रामवाडीपासून वाघोलीतील विठ्ठलवाडीपर्यंतचा विस्तार २०२९ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यातील खडकवासला ते हडपसर मार्गे खराडीपर्यंत जाणाऱ्या चौथ्या मार्गिकेला मंजुरी मिळाली असून, त्यातील माणिक बाग ते स्वारगेट मेट्रोसाठी जागेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे,’ असे ते म्हणाले.

हर्डीकर म्हणाले, ‘मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणून, येत्या पाच वर्षांत हा टप्पा पूर्ण करण्याचा मानस आहे. माणिक बाग ते स्वारगेट मेट्रोसाठी जागेचे सर्वेक्षण करण्यात येत असून, सिंहगड रस्त्यावरच हे काम होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.’

‘दुसऱ्या टप्प्याचा विस्तार हडपसरपासून लोणी-काळभोरपर्यंत आणि सासवड रस्त्यापर्यंत मेट्रोची लाईन ४ बी आणि ४ सीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्याबरोबरच भक्ती-शक्ती वरून मुकाई चौक, वाकड, पिंपळे-सौदागर, भोसरी आणि चाकणला जाणाऱ्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. विमानतळ आणि शिवाजीनगरच्या मार्गिका तीनचा विस्तार लष्कर परिसरातून कोंढवा, खडी मशीन चौक, एनआयबीएम रस्त्यापर्यंत जाणार असून, त्यासाठी डीपीआर बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘सध्या पुण्याचा वेगाने विस्तार होत आहे. त्यानुसार मेट्रोच्या कामांनाही गती देण्यात येत आहे. हे काम होत असताना नागरिकांना काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पुणे पोलीस, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला जोडण्यासाठी पादचारी पूल

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) लवकरच सुरू होणार असून, कामगार पुतळ्याजवळ तिन्ही लाईन्स एकत्र येत आहेत. त्यानुसार लाईन ३ आणि महामेट्रोचे इंटरचेंज स्थानक जोडण्यासाठी येत्या दोन-तीन महिन्यात पादचारी पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, या तिन्ही लाईनसाठी एकत्रितपणे तिकीटाची सोय करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

मेट्रो स्थानकापासून २५ मीटर अंतरावर नागरिकांना दळणवळणाची सुविधा असणे गरजेचे आहे. सध्या अशा पर्यायांची कमतरता आहे. हे दळणवळण सुधारण्यासाठी मेट्रो मार्गावर दर दहा मिनिटांना फीडर बस किंवा रिक्षा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जात आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो