पुणे : वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी बुधवारी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत. तसेच, मेट्रो संदर्भातील विविध कामांमधील बदल करण्याचे आणि वेग देण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिल्याने मेट्रोच्या विविध मार्गांच्या कामांना गती येणार आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रो भवन येथे मेट्रोच्या विविध प्रकल्पांबाबत नागरिकांच्या सूचना जाणून घेत बैठकीत निर्देश दिले. यावेळी पुणे मेट्रो आणि पुणे महापालिका यांच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पुणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत वनाज ते चांदणी चौक मेट्रो विस्तार मार्गिका आणि त्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेत आणि पौड रस्ता वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्यासाठी कचरा डेपोपासूनच नळ स्टॉपच्या धर्तीवर दुहेरी उड्डाणपूल उभारण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वाहनांची कोंडी दूर होण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पौड फाट्यापासून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गावर पौड फाट्यापासून तर थेट वनदेवी मंदिरापर्यंत दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याबाबत मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास सूचित केले असून याबाबत पुढील कार्यवाही लवकरच सुरु होत आहे. पूर्वी या मार्गावर पौड फाटा ते कर्वे पुतळादरम्यान केवळ वाहनांसाठी उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते, मात्र मंत्री मोहोळ यांना केवळ वाहनधारकांसाठीच नव्हे तर थेट वनदेवीपर्यंत मेट्रोसहित दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुहेरी उड्डाणपूलामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांसह डेक्कनहून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय जवळपास पाच सिग्नलचे चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहेत.