पुणे : मेट्रोच्या चार विस्तारित मार्गांपैकी दोन मार्गांची कामे सुरू होण्यास अजून विलंब लागणार आहे. मेट्रोच्या खराडी ते खडकवासला मार्गावरून जाणारा प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मार्गावरील प्रस्तावित दोन उड्डाणपूल याबाबत ‘महामेट्रो’ आणि पुणे महापालिकेचे एकमत होत नसल्याने तिढा आहे. परिणामी, ‘महामेट्रो’ला या दोन्ही मार्गांच्या उभारणीच्या निविदेला सहा महिने मुदतवाढ द्यावी लागली आहे.
पुणे मेट्रोच्या चार विस्तारित मार्गांचे भूमिपूजन आज, मंगळवारी होत आहे. त्यात वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या उभारणीच्या दिशेने प्रत्यक्ष पावले पडली आहेत. मात्र, नळ स्टॉप ते माणिकबाग या मार्गावर आंबेडकर चौक आणि कर्वे पुतळा येथे महापालिकेने दोन उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. या पुलांचा आराखडा अंतिम करण्यास महामेट्रो आणि पुणे महापालिकेला पाच ते सहा बैठका घ्याव्या लागल्या. त्याच वेळी राजकीय नेत्यांकडून ऐन वेळी आलेल्या सूचनांमुळे आराखड्यात बदल करण्यात आले.
‘हा आराखडा अंतिम झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या खर्चासहचा प्रस्ताव ‘महामेट्रो’ने महापालिकेकडे सादर केला. या दोन्ही उड्डाणपुलांचा ‘महामेट्रो’चा खर्चाचा अंदाज अधिक असल्याची भूमिका महापालिकेने घेतली. त्यामुळे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावर दांडेकर पूल चौकात उड्डाणपूल उभारण्याची सूचना महापालिकेने ‘महामेट्रो’ला केली. त्या वेळी ‘महामेट्रो’ने या मार्गाच्या उभारणीसाठी निविदाही काढली. ऐन वेळी करण्यात आलेल्या सूचनेनंतर पुन्हा उड्डाणपुलासह या मार्गाच्या रचनेचा आराखडा तयार करण्याबाबत तयारी सुरू झाली. मात्र, याच मार्गावरून उच्च क्षमता द्रुतगती मार्ग जात असल्याने उड्डाणपूल, मेट्रो मार्ग आणि ‘एचसीएमटीआर’ असे तिन्ही प्रकल्प एकत्रित करणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उड्डाणपुलाचा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला.
‘महापालिकेकडून ‘एचसीएमटीआर’चा अंतिम आराखडा मिळत नसल्याने ‘महामेट्रो’ला या मार्गाचाही अंतिम आराखडा सध्या तयार करता आलेला नाही. त्यामुळे या कामाच्या निविदेलाही मुदतवाढ द्यावी लागत आहे,’ असे सूत्रांनी सांगितले.
निविदेला वारंवार मुदतवाढ
नळ स्टॉप ते माणिकबाग आणि खडकवासला ते खराडी या मार्गांच्या उभारणीसाठी ‘महामेट्रो’ने २६ जूनला निविदा काढली. मात्र, महापालिकेकडून अचानक होणाऱ्या सूचना आणि बदल यामुळे या निविदेला वारंवार मुदतवाढ द्यावी लागली. या निविदेला एकूण सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता निविदा दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
नळ स्टॉप ते माणिकबाग या मार्गावरील उड्डाणपुलांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेला पाठविला आहे. याबाबत महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. याच वेळी खराडी ते खडकवासला मार्गावर सुमारे दोन किलोमीटर ‘एचसीएमटीआर’ असेल. त्याचा अंतिम आराखडाही महापालिकेकडून मिळालेला नाही. त्यामुळे या मार्गाच्या उभारणीसाठी काढण्यात आलेल्या निविदांना मुदतवाढ द्यावी लागत आहे. – अतुल गाडगीळ, संचालक (प्रकल्प), ‘महामेट्रो’
मेट्रो मार्गावरून जाणाऱ्या ‘एचसीएमटीआर’च्या आराखड्याबाबत ‘महामेट्रो’समवेत बैठका झालेल्या आहेत. हे काम कोणती संस्था करणार आणि त्याच्या खर्चाबाबत महापालिका आयुक्त आणि ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापकीय संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. तसेच, नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील दोन उड्डाणपुलांचा ‘महामेट्रो’ने दिलेला खर्चाचा प्रस्ताव जवळपास दीडपट आहे. त्यामुळे या खर्चाबाबतही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. – दिनकर गोजारे, मुख्य अभियंता, पुणे महापालिका
