पुणे : गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार असून, त्यासाठी वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गिकेवर चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. या चाचण्या पूर्ण होईपर्यंत सध्याच्या नियोजनानुसार, गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसाला सरासरी अडीच लाखांवर पोहोचली असून, गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावते. तर, गर्दी नसलेल्या कालावधीत दर दहा मिनिटांनी मेट्रोकडून सेवा देण्यात येते. गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी ‘महामेट्रो’कडून दर पाच मिनिटांनी गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वनाज ते रामवाडी या मार्गिकेवर चाचणी घेण्यात आली आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गिकेवर चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा देण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात मेट्रोच्या वेळेत बदल
गणेशोत्सव काळात पहिले तीन दिवस नेहमीप्रमाणेच रात्री अकरा वाजेपर्यंत सेवा देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी चोवीस तास सेवा देण्यात येणार आहे. ही मेट्रोसेवा नेहमीप्रमाणेच गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी सुरू राहील, असे मेट्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
दररोजचे प्रवासी अडीच लाखांवर
गेल्या काही दिवसांपासून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसाला सरासरी अडीच लाखांवर पोहचली आहे. गेल्या आठवडाभरात १७ लाख ८३ हजार ९३९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून २ कोटी ७१ लाख ४१ हजार ३७१ रुपये उत्पन्न मिळाले. तर, शनिवारी (५ सप्टेंबर) एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक २ लाख ७७ हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.
| मेट्रोच्या फेऱ्यांच्या वेळा | सध्या | प्रस्तावित |
| सकाळी ८ ते ११ | दर ६ मिनिटांनी | दर ५ मिनिटांनी |
| सकाळी ११ ते सायंकाळी ४ | दर १० मिनिटांनी | दर १० मिनिटांनी |
| सायंकाळी ४ ते ८ | दर ६ मिनिटांनी | दर ५ मिनिटांनी |
| रात्री ८ ते ११ | दर १० मिनिटांनी | दर १० मिनिटांनी |
गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वनाज ते रामवाडी या मार्गिकेवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गिकेवरील चाचण्या सुरू आहेत. त्यानंतर लवकरच गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो धावेल. – श्रावण हर्डीकर, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
