पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोकडून मेट्रो फेऱ्या आणि सेवेच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण मेट्रो मार्गावर गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

गणेशोत्सवकाळात मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात येऊन मार्गिका बदलणे टाळावे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिका १ वरून मध्यवर्ती पेठांमध्ये येणाऱ्या प्रवाशांनी कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा वापर करावा. वनाजच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांनी डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावर, तर रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांनी पुणे महानगरपालिका (पीएमसी) मेट्रो स्थानकाचा वापर करावा. या कालावधीत गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी केवळ परतीच्या प्रवासासाठीच महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाचा वापर करावा, असे आवाहन ‘महामेट्रो’कडून करण्यात आले आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक एकदिशात्मक स्वरुपात कार्य करेल. त्यानुसार लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्रमांक ३ हे केवळ स्थानकात प्रवेश करण्यासाठी खुले असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २ हे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असेल, असेही ‘महामेट्रो’कडून कळविण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील मेट्रोचे वेळापत्रक

  • १४ ते १६ सप्टेंबर – सकाळी ६ ते ११ (नियमित)
  • १७ ते २४ सप्टेंबर – सकाळी ६ ते पहाटे २
  • २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) – सकाळी ६ ते २६ सप्टेंबर रात्री ११
  • २७ सप्टेंबरपासून – सकाळी ६ ते रात्री ११ (नियमित)
  • उत्सवकाळात सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.