पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘एचसीएमटीआर’ उन्नत मार्गिका आणि शहरात नियोजित मेट्रो मार्गिका काही ठिकाणी एकमेकांना छेदत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचे एकत्रित नियोजन करण्यासाठी महापालिका आणि महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.
सिंहगड रस्त्यावरील हिंगणे ते स्वारगेटदरम्यान सुमारे अडीच ते तीन किलोमीटरचा मार्ग दोन्ही प्रकल्पांसाठी समान असल्याने या भागातील कामांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक घेण्यात आली.
शहरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेगवेगळ्या पातळ्यांबर बैठका होत आहेत. ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुढील तीन महिन्यांत तयार करण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.
खडकवासला ते स्वारगेट आणि पुढे सोलापूर रस्त्याने मुंढवा या मेट्रो मार्गाच्या कामावर ‘महामेट्रो’ने लक्ष केंद्रित केले आहे. या मेट्रो मार्गिका आणि ‘एचसीएमटीआर’ मार्गिका शहरात आठ ठिकाणी एकमेकांना छेदत आहेत. सिंहगड रस्त्यावरील हिंगणे ते स्वारगेट या दरम्यान दोन्ही मार्गिका एकाच रस्त्यावरून जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या बांधकामाचे नियोजन सुरुवातीपासूनच समन्वयाने करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेत महामेट्रो आणि पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक झाली.
या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महापौर मंजूषा नागपुरे, सिंहगड रस्त्याचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे गटनेते काका चव्हाण उपस्थित होते.
या बैठकीत ज्या ठिकाणी दोन्ही मार्ग एकमेकांना छेदत आहेत. तेथे दुमजली पुलाचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. काही ठिकाणी मेट्रोचा पूल उंचावर, तर त्याखालून ‘एचसीएमटीआर’चा पूल अशी रचना करण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जागा, दोन्ही प्रकल्पांच्या मार्गिका आणि प्रत्यक्ष बांधकामादरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणी यावरही देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुणे शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहतुकीची नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नक्की काय उपाय योजना करता येतील यावर वेगवेगळ्या माध्यमातून काम केले जात आहे. सध्या शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागत आहे.
