पुणे : पुणे मेट्रोच्या तिन्ही मार्गिकांवरील प्रवासासाठी दोन क्यूआर कोड असलेले तिकीट देण्यात येणार असून, प्रवाशांना हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मार्गिकेवरील क्यू-आर कोड स्वतंत्र स्कॅन करूनच पुढचा प्रवास करावा लागणार आहे. ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
‘सध्या ‘महामेट्रो’कडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गिकांवर प्रवासासाठी एकच तिकीट देण्यात येते. तर, हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मार्गिकेची उभारणी पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आली आहे. या मार्गिकेवरील प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट घ्यावे लागणार आहे. मात्र, मेट्रोच्या तिन्ही मार्गिकांवरील स्थानकांमध्ये, ‘महामेट्रो’च्या ॲपवर आणि व्हॉट्सअॅपवरही तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तिकिटांवरील क्यूआर दोन स्वतंत्र प्रवेशद्वारांवर स्कॅन करून पुढचा प्रवास करता येणार आहे. ‘एनसीएमसी’ कार्डधारकांना तिकिटाची आवश्यकता नसून, दोन्ही प्रवेशद्वारांवर कार्ड स्कॅन करून पुढे जाता येणार आहे,’ अशी माहिती हर्डीकर यांनी दिली.
‘पीएमआरडीए मेट्रोसाठी एकच तिकीट व्यवस्था विकसित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही व्यवस्था सुरू होण्यासाठी आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ‘महामेट्रो’चे तिकीट काढल्यानंतर त्यातील संबंधित रक्कम ‘पीएमआरडीए’ला मिळेल, अशी यंत्रणा विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘प्रवासी संख्येत लाखाची भर’
हिंजवडी ते शिवाजीनगर ही तिसरी मार्गिका सुरू झाल्यानंतर ‘महामेट्रो’च्या दैनंदिन प्रवाशांमध्येही एक लाखाची वाढ अपेक्षित असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. सध्या मेट्रोच्या दैनंदिन प्रवाशांनी तीन लाखांचा टप्पा ओलांडला असून, दररोज सरासरी अडीच ते पावणे तीन लाख प्रवासी मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर प्रवास करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गर्दीच्या वेळी ‘महामेट्रो’कडून दर पाच मिनिटांनी गाड्या सोडण्यात येतात. तिसऱ्या मार्गिकेवर दोन इंटरचेंज स्थानके उभारण्यात येणार असून, त्यातील एक स्थानक आजपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन’
हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मार्गिकेसह पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नवीन मार्गिकांचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या टप्प्यात वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विश्रांतवाडी, खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि नळस्टॉप-वारजे ते माणिकबाग या मार्गिकांचे काम करण्यात येणार आहे. हा टप्पा येत्या साडेचार वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
