पुणे : पुणेरी मेट्रोच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, जुलै महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे. मात्र, या संपूर्ण मार्गावरील सर्व स्थानकांवर सेवा सुरू होण्यास पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ लागल्याने एकूण खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्चाचा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) कंपनी उचलणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या पुणेरी मेट्रोच्या कामाच्या प्रगतीची माहिती ‘पीआयटीसीएमआरएल’ कंपनीचे मुख्याधिकारी अनिल कुमाल सैनी आणि मुख्य वित्तीय अधिकारी मितुल झवेरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके आहेत. यातील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यान पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून या मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केला जाईल. त्या वेळी ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. ही सेवा १५ जुलैपासून सुरू करण्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नियोजन आहे.

या प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे खर्चात होणाऱ्या वाढीबाबत मुख्य वित्तीय अधिकारी मितुल झवेरी म्हणाले की, मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यास नियोजित मुदतीपेक्षा एक वर्षाहून अधिक काळ उशीर लागला आहे. यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात वाढ होणार आहे. प्रामुख्याने ही वाढ प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेवरील व्याजात होईल. हा आर्थिक बोजा कंपनी उचलणार आहे. प्रकल्प विलंब झाल्यामुळे खर्चात एकंदरीत सुमारे २० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मेट्रो प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाबत अनिल कुमार सैनी म्हणाले, ‘पुणेरी मेट्रोच्या कामास गणेशखिंड रस्त्यावर प्रामुख्याने विलंब लागला. शहरातील गर्दीच्या भागात काम करताना अनेक अडचणी येतात. रहदारीच्या वेळी काम करता येत नसल्याने रात्रीच्या वेळी काम करावे लागते. यामुळे या कामास उशीर झाला आहे. आमच्याकडून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांपर्यंत सेवा करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावर सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. उरलेल्या ११ स्थानकांपर्यंत सेवा सुरू करण्याचे काम ऑगस्टअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर भोसलेनगर आणि शिवाजीनगर ही स्थानके वगळून सेवा सुरू करता येईल.’

‘पुणेरी मेट्रोच्या भोसलेनगर आणि शिवाजीनगर या दोन स्थानकांवरील काम पुढील वर्षी मार्चअखेरीस पूर्ण होईल. मेट्रो प्रकल्पाच्या कामास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ विलंब झाला आहे. या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली आहे. हा वाढलेल्या खर्चाचा बोजा ‘पीआयटीसीएमआरएल’ उचलेल. या मार्गावरील सर्व स्थानकांवरील सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या २ ते २.५ लाखांवर जाईल,’ असे सैनी यांनी सांगितले.

पुणेरी मेट्रो – हिंजवडी ते शिवाजीनगर

एकूण लांबी – २३.३ किलोमीटर
एकूण गाड्या – २२

कमाल वेग – ताशी ८५ किलोमीटर

सरासरी वेग – ताशी ३७ ते ४० किलोमीटर

सध्याचा प्रवासाचा वेळ – १ तास ३० मिनिटे

मेट्रोतून प्रवासाचा वेळ – ४५ मिनिटे

मेट्रो प्रकल्पाचा वाढता खर्च

प्रस्तावित खर्च – ८ हजार ३१३ कोटी रुपये

विलंबामुळे खर्चात वाढ – सुमारे २० टक्के

मेट्रोचा पहिला टप्पा

माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय

स्थानके – ११

लांबी १३.३ किलोमीटर

सुरू होणे अपेक्षित – १५ जुलै

मेट्रोचा दुसरा टप्पा

बालेवाडी हायस्ट्रीट ते जिल्हा न्यायालय

स्थानके – ११

लांबी – १० किलोमीटर

काम पूर्ण होणे अपेक्षित – ऑगस्ट