पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील प्रवेशद्वार सुरू केले आहे. तसेच, रामवाडी आणि कासारवाडी येथील स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंडई मेट्रो स्थानकाजवळ भाजीमंडई, तुळशीबाग, घाऊक केंद्र, पर्यटन आणि धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मंडई मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. आतापर्यंत पूर्वेकडील प्रवेशद्वारावरून स्थानकामध्ये प्रवेश केला जात होता. आता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याच्या बाजूचे प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना बाबू गेनू गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, दत्त मंदिर, तुळशीबाग, शनिपार या ठिकाणी जाणे सोपे होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
रामवाडी मेट्रो स्थानकावरील प्रवेश क्रमांक दोन आणि कासारवाडी मेट्रो स्थानकातील क्रमांक तीन या ठिकाणी सरकत्या जिन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे म्हणाले, ‘प्रत्येक घटकातील प्रवाशाला सेवा सुुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामेट्रोचा प्रयत्न आहे. लवकरच अन्य स्थानकांवर या सुविधा देण्यात येणार आहेत.