पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसाठी पाच ते सहा पर्यायांची चाचपणी करण्यात आली असून, कल्याणीनगर ते विमानतळ या मार्गिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या मार्गाबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (महामेट्रो) तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची सूचना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली.

त्याचबरोबर धावपट्टी आणि विमानतळ परिसराच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या रस्त्याच्या जागांचे भूसंपादन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी सोमवारी प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेऊन प्रकल्पांचा आढावा घेतला. ‘विकास प्रकल्प कालबद्धपणे आणि दर्जेदार झाले पाहिजेत,’ अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी, तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते.

महामेट्रोकडून रामवाडी ते वाघोली, खडकवासला ते हिंजवडी, वनाज ते चांदणी चौक या मार्गिका विस्तारीकरणाबाबत कामे सुरू आहेत. त्यात विमानतळापर्यंत मेट्रो मार्गिका करण्यात यावी, अशी नागरिकांकडून आग्रही मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पर्यायी मार्गांची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, विमाननगर परिसरातील आजूबाजूच्या मोठ्या इमारती, व्यावसायिक कार्यालये, पंचातारांकित हाॅटेल आणि इतर आस्थापना असल्याने व्यावहारिकदृष्टया अडचणी येत होत्या. अखेर महामेट्रोने सहा पर्यायांद्वारे चाचपणी करून रामवाडी ते वाघोली या प्रस्तावित मेट्रो मार्गिकेवर कल्याणीनगर स्थानकापासून विमानतळापर्यंत मेट्रो मार्गिका व्यवहार्य असल्याचे निश्चित केले.दरम्यान, लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण महत्त्वाचे असून, त्यासाठीच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीचा आढावा मोहोळ यांनी घेतला.

‘या’ मेट्रो मार्गिकांचे काम लवकरच

‘वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून साकारलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरील २३ पैकी १३ स्थानकांचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे,’ असे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

बैठकीत करण्यात आलेल्या इतर सूचना

  • नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि पुनरुज्जीवन वेगाने करावे.
  • समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत साठवणूक टाक्यांना आणि जलवाहिन्यांना त्वरित मीटर बसवावेत.
  • शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करावेत.
  • प्रदूषणवाढीबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात.
  • भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृहाचे काम वेळेत पूर्ण करावे.