पुणे : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन’च्या (महामेट्रो) प्रस्तावित खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेच्या ‘कारशेड’साठी लागणाऱ्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी थेट दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयालाकडे मागणी करण्यात येणार आहे. खडकवासला येथील केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राने (सीडब्ल्यूपीआरएस) दोनदा पाठविलेल्या प्रस्तावाला नकार दिल्याने ‘महामेट्रो’कडून पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे.

शहराच्या पूर्व भागातून दक्षिण, उत्तर आणि मध्य पुण्यात सहज प्रवास करता यावा, वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळावा, याकरिता ‘महामेट्रो’कडून खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा प्रकल्प प्रस्तावित असून, केंद्राच्या अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे. तब्बल ३१.६४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पावर २८ स्थानके असून, राज्य सरकारकडून ९८९७ कोटींचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रस्तावित मार्गाला राज्याची मंजुरी मिळाली आहे. या मेट्रो प्रकल्पातील कारशेड हे खडकवासला येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी ‘महामेट्रो’ने खडकवासला येथील ‘सीडब्ल्यूपीआरएस’च्या आवारातील २० हेक्टर मोकळ्या जागेची मागणी केली आहे.

‘महामेट्रो’ने ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘सीडब्ल्यूपीआरएस’ला जागेबाबत पत्र पाठविले होते. तसेच, जून २०२५ मध्ये पुन्हा स्मरणपत्र पाठवून जागेची मागणी केली.

मात्र,‘सीडब्ल्यूपीआरएस’ने जागा उपलब्ध नसल्याचे कारण देऊन नकार दिला. या पार्श्वभूमीवर ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ४ फेब्रुवारी रोजी संस्थेला भेट देऊन संचालक डॉ. प्रभात चंद्रा यांच्याशी चर्चा केली. कारशेडकरिता जागा कशी महत्त्वाची आहे, याबाबत कल्पना देण्यात आली. तरीदेखील जागा देण्यास ‘सीडब्ल्यूपीआरएस’ उत्सुक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता थेट केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडेच जागेसाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

सीडब्ल्यूपीआरएस’चे म्हणणे काय ?

संस्थेत नदी, धरणे, महासागरांची मोठी प्रारूपे खूप आहेत. मोठे-मोठे हँगर्स आहेत. त्यामुळे आताच संस्थेची खूप जागा वापरात असून आमच्या प्रकल्पांसाठी संस्थेच्या हक्काच्या उपलब्ध जागेचा वापर आगामी काळातही करावा लागणार आहे. तसेच भविष्यात विस्तारीकरणासाठी देखील जागा लागणार आहे. संस्था केवळ संख्यात्मक आणि गणितीय पद्धतींनुसार अभ्यास करत नाही, तर प्रत्यक्षातील मोठे प्रारूप संस्थेच्या आवारात तयार करून त्यावर अभ्यास केला जातो. त्यामुळे संस्थेची जागा अन्य वापरासाठी देण्याचा प्रश्नच येत नाही, असे संस्थेकडून ‘महामेट्रो’ला सांगण्यात आले आहे.

खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो प्रकल्पासाठी खडकवासला मार्गिका तयार करण्यात येणार असून, खडकवासला येथे कारशेड करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ‘सीडब्ल्यूपीआरएस’ला प्रस्ताव दिला असून नकार दिला जात असून, याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. -आर. टी. शिंदे, अपर जिल्हाधिकारी, महामेट्रो

संस्थेची खूप जागा वापरात असून, आमच्या प्रकल्पांसाठी संस्थेच्या हक्काच्या उपलब्ध जागेचा वापर आगामी काळातही करावा लागणार आहे. तसेच, भविष्यात विस्तारीकरणासाठीदेखील जागा लागणार आहे. संस्थेकडे देशभरातील विविध राज्ये, संस्थांसह नदी, धरणांबाबत संशोधनाची मोठी कामे करण्यात येत आहे. त्यामुळे इतर कारणांसाठी आमच्याकडे जागा उपलब्ध नाही.- डॉ. प्रभात चंद्रा, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस