पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर ही पुणेरी मेट्रो दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाली आहे. या मेट्रोच्या उद्घाटनासाठी सहा महिन्यांपासून मुहूर्त मिळत नव्हता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या पुणेरी मेट्रोच्या सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये दररोज कामानिमित्त प्रवास करणारे आयटी कर्मचारी आणि नागरिक यांनी मेट्रोमुळे वाहतूककोंडीतून सुटका झाल्याची भावना व्यक्त केली. मात्र, पहिल्याच दिवशी प्रवाशांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो.

पुणेरी मेट्रो ही हिंजवडी ‘आयटी पार्क’ला पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरशी जोडते. पुणेरी मेट्रोची पहिली गाडी पहाटे सहा वाजता माण आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांमधून एकाच वेळी सुटली. ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानकावर प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रवाशांमध्ये नोकरदारांसह लहान मुले आणि ज्येष्ठांचाही समावेश होता. याचबरोबर पहिला मेट्रो प्रवास करून गाडीतून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. हा मेट्रो मार्ग २३.२ किलोमीटरचा असून, या प्रवासासाठी एकूण ४५ मिनिटांचा वेळ लागला. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, त्यातील १७ सध्या सुरू आहेत. इतर स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत.

आरामदायी प्रवास

मेट्रोच्या प्रवासाबद्दल अनेक ‘आयटी’ कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासह आरामदायी पद्धतीने प्रवास करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर मेट्रो सुरू झाल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अडचणींचा पहिला दिवस

मात्र, तिकिटाचा दर अधिक असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. पुणे मेट्रोपेक्षा पुणेरी मेट्रोचे तिकीट दर दुप्पट असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मेट्रोचे उपयोजन (ॲप) वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रारही काही प्रवाशांनी केली. तसेच, जिल्हा न्यायालयात स्थानकात मेट्रो बदलताना तिकिटावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन होत नसल्याचेही अनेक प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.

सेवा सुरू झालेली स्थानके
माण, एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज-२ सर्कल २, हिंजवडी फेज-२ सर्कल १, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-१, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे), मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी), औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, जिल्हा न्यायालय या १७ स्थानकांवरील सेवा सुरू झाली आहे.

सेवा सुरू नसलेली स्थानके

बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसलेनगर आणि शिवाजीनगर या स्थानकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही स्थानके पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतील.