Pune Metro Line 3 Hinjewadi to Shivaji Nagar Update: पुणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या आणि हिंजवडी आयटी पार्कला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर या ‘मेट्रो मार्ग-३’ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ‘पीएमआरडीए’च्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी विविध ठिकाणांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला.

‘पीएमआरडीए’द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाच्या ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (पीआयसीटीएमआरएल) सोबत हा प्रकल्प राबविला जात आहे. मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात कामाची गुणवत्ता आणि प्रगतीवर विशेष भर देण्यात आला. पाहणीदरम्यान विद्यापीठ चौकातील पाषाण रॅम्पजवळ महापालिकेच्या जलवाहिनीतून मोठी पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आले. या गळतीमुळे मेट्रोच्या कामात अडथळा येत असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही गळती तातडीने थांबविण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, ‘पीआर २१’ येथील पाहणीदरम्यान मेट्रोच्या जिन्यासाठी आवश्यक असलेली जागा मोकळी करण्याचे आदेशही देण्यात आले. यामुळे या भागातील जिन्याचे प्रलंबित काम मार्गी लागणार आहे. बाणेर येथील ‘पीएआर १५’ ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो जिन्याच्या कामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली. केवळ वेगच नव्हे, तर कामाची गुणवत्ताही आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी, असे निर्देश के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता सुमीत यादव, गजानन पाटील यांच्यासह पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते उपस्थित होते.

अशी आहे मेट्रो…

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. माण डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात यशस्वीरीत्या पार पडली. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून शहरातून हिंजवडीला कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. हा मार्ग भारतातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारीत ( पीपीपी) उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाले होते. आतापर्यंत प्रकल्पासाठी चार मेट्रो रेलगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक गाडीत सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करू शकणार असून ८० किमी प्रतितास या वेगाने गाड्या धावणार आहेत.

प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याला आमचे प्राधान्य आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर दिलासा मिळावा, यासाठी ‘पीएमआरडीए’ प्रशासन प्रयत्नशील आहे. – के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीए.