पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची पुणेकरांना प्रतीक्षा असून, आधी सात मुहूर्त हुकल्यानंतर आता या सेवेसाठी आठवा मुहूर्त काढण्यात आला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही मार्गिका आहे. या मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीसमवेत राबविण्यात येत आहे. ही सेवा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, कामे अपूर्ण असल्याने ती सुरू झाली नाही. त्यानंतर अनेक मुहूर्त जाहीर करण्यात आले; परंतु गेल्या सव्वा वर्षात ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. अलीकडे हिंजवडी ते बाणेरदरम्यान १२ स्थानकांपर्यंत १५ जूनपासून सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. आता हे नियोजनही शक्य न झाल्याने ही सेवा जुलै महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘पीएमआरडीए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गिकेचे काम ९५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले आहे. हिंजवडीपासून बाणेरपर्यंतच्या मेट्रो स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. या मार्गिकेची तपासणी करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पत्र लिहिण्यात आले होते. त्यांच्याकडून या महिन्याच्या अखेरची वेळ तपासणीसाठी मिळाली आहे. त्यामुळे मेच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या सुरुवातीला ही तपासणी होईल. या तपासणीनंतर आयुक्तांकडून मेट्रो सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे जुलैमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, जुलैमध्ये ती कधी सुरू होईल, याची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात यंदा मार्चमध्ये झालेल्या कार्यक्रमात ही मेट्रो सेवा दोन टप्प्यांत सुरू करण्याचे जाहीर केले होते. पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. हे दोन्ही मुहूर्त हुकले असून, त्यानंतर आता जुलैमध्ये सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
जून अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे बारा स्थानकांपर्यंतचे काम ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणीसाठी या महिन्याच्या अखेरची तारीख देण्यात आली आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यात उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर काम केले जाईल. मेट्रो मार्ग १२ स्थानकांपर्यंत खुला करण्याची सर्व प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जुलै महिन्यात मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो
एकूण लांबी – २३ किलोमीटर
एकूण स्थानके – २३
मेट्रो सेवा सुरू करण्याचे मुहूर्त
१) मार्च २०२५
२) सप्टेंबर २०२५
३) डिसेंबर २०२५
४) मार्च २०२६
५) मे २०२६
७) १५ जून २०२६
८) जुलै २०२६
पहिल्या टप्प्यातील सेवा
जुलै – १२ स्थानके
माण ते रामनगर (बाणेर)
दुसऱ्या टप्प्यातील सेवा
ऑक्टोबर – ११ स्थानके
हाय स्ट्रीट (बाणेर) ते शिवाजीनगर
