पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या पुणेरी मेट्रोतून (मार्गिका-३) आता सायकल नेता येणार नाही.‘सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी कृपया मेट्रोमध्ये सायकल घेऊन येऊ नका,’ असे आवाहन पुणेरी मेट्रोकडून समाजमाध्यमांद्वारे करण्यात आले आहे.पुणेरी मेट्रोच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलवर ‘BICYCLES ARE NOT ALLOWED IN PUNERI METRO’ अशा आशयाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणेरी मेट्रो ही हिंजवडी ‘आयटी पार्क’ला पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरशी जोडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पुणेरी मेट्रो’च्या हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचे सोमवारी (३ नोव्हेंबर) लोकार्पण करण्यात आले. हा मेट्रो मार्ग २३.२ किलोमीटरचा असून, या प्रवासासाठी एकूण ४५ मिनिटांचा वेळ लागला. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, त्यातील १७ सध्या सुरू आहेत. इतर स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये दररोज कामानिमित्त प्रवास करणारे आयटी कर्मचारी आणि नागरिकांची या मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सेवा सुरू झालेली स्थानके
माण, एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज-२ सर्कल २, हिंजवडी फेज-२ सर्कल १, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-१, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे), मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी), औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, जिल्हा न्यायालय या १७ स्थानकांवरील सेवा सुरू झाली आहे.
सेवा सुरू नसलेली स्थानके
बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसलेनगर आणि शिवाजीनगर या स्थानकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही स्थानके पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होतील, असे पुणेरी मेट्रोकडून कळविण्यात आले आहे.
नियम काय?
- कोणत्याही प्रकारची, आकाराची सायकल मेट्रोच्या डब्यात घेऊन जाता येणार नाही.
- हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांमध्येही सायकल आणता येणार नाही.
- सायकलसह प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचना पुणेरी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
‘महामेट्रोतून सायकल नेता येते’
महामेट्रोच्या वनाज-रामवाडी (मार्गिका-२) आणि पीसीएमसी-स्वारगेट (मार्गिका-१) या मार्गिकेवर प्रवास करणाऱ्यांना मेट्रोतून सायकल घेऊनही प्रवास करता येतो. तिथे सायकल हातात धरून, इतरांना अडथळा न करता नेता येते. त्यामुळे त्या मार्गिकेवरून हिंजवडी-शिवाजीनगरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही सायकल नेता येणार नाही.
‘मेट्रो उतरल्यावर घर-ऑफिसपर्यंत कसे जायचे? सायकलशिवाय लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा फायदा काय?’ असा सवाल सायकलस्वार करत आहेत. किमान गर्दी नसलेल्या वेळेत किंवा कमी जागेत मावणाऱ्या फोल्डिंग सायकलला परवानगी द्यावी, अशी मागणी सायकलस्वारांकडून करण्यात येत आहे.
.
