पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याची प्रतिक्षा पुणेकरांना आहे. मेट्रो सुरू होण्याचा मुहुर्त सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र, पुणेरी मेट्रोने सेवा सुरू करण्यापूर्वीच प्रवाशांसाठी स्मार्ट तिकीटाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची घाई केली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवर टप्प्याटप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर दोन प्रवेशद्वार, दोन निर्गमनद्वार आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र असे पाच एएफसी प्रवेशद्वार असणार आहेत. गर्दीच्या वेळी प्रवाशांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी स्मार्ट क्यू व्यवस्थापनाची सुविधाही या प्रणालीत समाविष्ट करण्यात आली आहे. उर्वरित स्थानकांवरही ही प्रणाली बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पुणेरी मेट्रोकडून देण्यात आली.
स्मार्ट तिकीट व्यवस्थेत काय?
पुणेरी मेट्रोकडून प्रवाशांसाठी अत्याधुनिक स्मार्ट तिकीट व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी), व्हॉट्सअॅप क्युआर तिकीट, मोबाईल अॅप, तिकीट व्हेंडिंग मशीन (टिव्हीएम) आणि तिकीट काउंटर अशा सुविधांद्वारे प्रवाशांना अवघ्या काही क्षणांत मेट्रोचे तिकीट घेता येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक जलद, सुलभ आणि पूर्णपणे डिजिटल होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आले.
केंद्र सरकारच्या वन नेशन, वन कार्ड उपक्रमांतर्गत हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेवर प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या दिवसापासूनच एनसीएमसी कार्ड वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डद्वारे पुणे मेट्रोच्या लाईन १, लाईन २ आणि देशातील इतर मेट्रो सेवांचाही वापर करता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांसाठी स्वतंत्र कार्ड बाळगण्याची गरज राहणार नाही.
पुणे मेट्रोसाठी एकच तिकीट कधीपासून?
सध्या मेट्रो लाइन १ आणि लाइन २ साठी तिकिटाची सुविधा उपलब्ध असलेल्या पुणे मेट्रो या मोबाईल अॅपवरही मेट्रो लाइन ३ वरील तिकीट आरक्षित करता येणार आहे. सुरूवातीला मेट्रोच्या अॅपमध्ये लाइन ३ च्या तिकीटासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध असेल. मात्र, जिल्हा न्यायालय स्थानकावर तिन्ही मार्गांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच अॅपद्वारे संपूर्ण पुणे मेट्रोसाठी तिकीट आरक्षण करता येईल, अशी ग्वाही पुणेरी मेट्रोकडून देण्यात आली आहे.
स्मार्ट तिकीट व्यवस्थेची वैशिष्ट्ये
- एकाच एनसीएमसी कार्डवर मेट्रोचा प्रवास
- व्हॉट्सअॅप क्युआरच्या माध्यमातून थेट तिकीट
- मोबाईल अॅपवरून ऑनलाइन तिकीटाची सुविधा
- प्रत्येक स्थानकावर तिकीट व्हेंडिंग मशीन आणि तिकीट काउंटरची सोय
- तिकिटासाठी रोख रक्कम, युपीआय, डेबिट कार्ड आदी पर्याय
- दिव्यांगांसाठी सुलभ तिकीट व्हेंडिंग मशीन
- स्मार्ट एफसी गेट्समुळे जलद प्रवेश-निर्गमन
- लवकरच एका अॅपवर संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कचे तिकीट
