Pune Metro extension: शहराच्या पूर्वेकडील उपनगरीय वाहतुकीमध्ये सुलभता आणण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे. मेट्रो मार्गिका विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत प्रस्तावित हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रस्ता या मेट्रो उपमार्गिकांच्या संरेखन आराखड्यासाठी (डिझाइन) सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महामेट्रोकडून निविदा मागविण्यास सुरुवात झाली असून, ४ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. गुणवत्ता आणि मूल्यमापनाच्या निकषानुसार पात्रता सिद्ध केल्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होताच ४८ महिन्यांमध्ये संरेखन आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले.
महामेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मार्गिकेचा विस्तार म्हणून हे दोन उपमार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून या दोन्ही मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार हडपसर ते लोणी काळभोर (मार्गिका क्रमांक चार-ब) हा मार्ग ११.३५ किलोमीटर लांबीचा असून, त्यात दहा उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर हडपसर बस डेपो ते सासवड रस्ता (मार्गिका क्रमांक ४-क) हा मार्ग ५.५७ किलोमीटरचा असून, यादरम्यान चार उन्नत स्थानके आहेत. दोन्ही मिळून १४ स्थानकांसह सुमारे १७ किलोमीटरचा हा विस्तार पूर्व पुण्यापासून पश्चिम पुण्यास जोडला जाणार आहे.
या प्रकल्पासाठी ‘डिटेल्ड डिझाइन कन्सल्टन्सी’ (डीडीसी) सेवांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये स्थानकांचे सविस्तर अभियांत्रिकी संरेखन, बांधकाम नियोजन, पूर्वानुमान आणि संबंधित तांत्रिक बाबींचा समावेश आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर नुकतीच बैठक झाली असून, सल्लागाराच्या नियुक्तीनंतर प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि पुढील टप्प्यांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे नियोजन असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सर्वाधिक फायदा
महामेट्रोच्या या विस्तारित प्रकल्पामुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर, सासवड परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल. सध्या या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रवासाचा वेळ आणि प्रदूषण यात लक्षणीय घट होईल. तसेच, पुढील टप्प्यात प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडणी देण्याचे नियोजन असल्याने, हा भाग शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी महामेट्रोकडून दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर-सासवड हे प्रस्तावित प्रकल्प साकारण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली आहेत.- चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो, पुणे</strong>
