पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी (१४ सप्टेंबर) पुणेकरांनी प्रवासासाठी मेट्रोला पसंती दिली असून, २ लाख ६२ हजार ६७१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. गणेशोत्सवात गर्दीचे नियोजन करण्यासाठी ‘महामेट्रो’कडून गाड्यांच्या फेऱ्या दर ५ मिनिटांनी करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी २ लाख १६ हजार ३७४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या वर्षी त्यामध्ये ४६ हजार २९७ हून अधिक प्रवाशांची (२१.४० टक्के) वाढ झाली. यंदा मेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकात (इंटरचेंज) ५८ हजार ९४८ प्रवाशांची नोंद झाली. तर, महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात सर्वाधिक ५१ हजार ५३३ प्रवाशांनी प्रवास केला. ‘पीसीएमसी’ स्थानकात २५ हजार ४२९, रामवाडी स्थानकात २३ हजार ६४४, स्वारगेट स्थानकात २१ हजार ०९९ आणि ‘पीएमसी’ मेट्रो स्थानकात १९ हजार २६७ प्रवाशांची नोंद झाली.

दरम्यान, ‘गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कसबा पेठ, स्वारगेट, पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान या मेट्रो स्थानकांचा वापर करावा. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाचा वापर प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी करावा. स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा,’ असे आवाहन ‘महामेट्रो’कडून निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी ‘पीएमपी’च्या जादा गाड्या

पुणे : गणेशोत्सवासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, उद्या (१७ सप्टेंबर), १८ आणि २४ सप्टेंबर या दिवशी १७३ अतिरिक्त बस, तर प्रवाशांच्या गरजेनुसार १९ ते २३ सप्टेंबर आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी (२५ सप्टेंबर) ६२६ अतिरिक्त बस धावणार आहेत.

‘संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान या बस रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यासाठी तिकिटांच्या दरामध्येही वाढ करण्यात आली नसून, रात्री १२ वाजेपर्यंत पास सवलत देण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली.

गणेशोत्सवात सायंकाळी शहरातील मुख्य रस्ते बंद असतात. त्यामुळे मध्यवर्ती पेठांतील बससेवा पर्यायी मार्गांनी सुरू राहणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मार्गांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत.

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी स्वारगेट चौक बंद राहणार आहे. स्वारगेट परिसरातील बसथांबे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहेत. सातारा रस्त्याने कात्रज आणि मार्केट यार्डकडे जाणारी बससेवा आता लक्ष्मी नारायण चौक येथून सुटणार आहे. ‘सिंहगड रस्त्याकडे जाणारी बससेवा पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) बस थांबा येथून उपलब्ध होईल. स्वारगेट स्थानकाच्या बाहेरील सोलापूर रोड (पूलगेट, हडपसर) आणि भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ या मार्गावरील बस वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ) येथून धावतील,’ अशी माहिती ‘पीएमपी’कडून देण्यात आली आहे.