पुणेः वीज पुरवठा खंडीत झाल्याने रविवारी दुपारी पुणे मेट्रोची सेवा सुमारे अर्धा तास ठप्प होती. पिंपरी-चिंचवड आणि रेंज हिल्स मेट्रो स्थानकाकडून येणारा वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने महामेट्रोला पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवरील आठ गाड्या फलाटावरच थांबवून ठेवाव्या लागल्या. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

महावितरणकडून पुणे मेट्रोला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि रेंज हिल्स स्थानकाजवळील रिसिव्हींग स्टेशनच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. रविवारी (६ सप्टेंबर) दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी या यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे पुणे मेट्रो मार्गिका एकवरून धावणाऱ्या गाड्यांसह सर्व स्थानकांमधील दिवे, एस्केलेटर, लिफ्ट, तिकीट यंत्रणा आदींसाठी आवश्यक वीज पुरवठा खंडीत झाला. परिणामी, या मार्गिकेवरून धावणाऱ्या आठ गाड्या फलाटावरच थांबवून ठेवण्याची वेळ महामेट्रोवर आली.

वीजपुरवठा बंद होताच मेट्रोच्या नियंत्रण कक्षाने मेट्रोच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांना विलंबाबाबत सातत्याने सूचना देण्यास सुरुवात केली. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावर धावत असलेल्या आठ गाड्या आहे, त्याच स्थानकांवर थांबवण्यात आल्या. गाड्या बोगद्यात किंवा मार्गिकेवर अडकू नयेत, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले.

मेट्रोच्या तांत्रिक पथकाने वनाज येथील उपकेंद्रातील पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू केला. अखेर १२ वाजून ४७ मिनिटांनी वनाज उपकेंद्रातून मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेवरून धावणाऱ्या गाड्यांसाठी वीज पुरवठा करण्यात आला. त्यानंतर फलाटांवर थांबवण्यात आलेल्या आठ गाड्या सोडण्यात आल्या. दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी स्थानकांवरील सुविधांसाठी आवश्यक वीज पुरवठाही सुरु करण्यात आला. तर एक वाजून ५० मिनिटांनी महावितरणकडून रेंज हिल्स सबस्टेशनला येणारा मुख्य वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असेही महामेट्रोकडून कळविण्यात आले.

दरम्यान, प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेवरील मेट्रो वाहतूक पूर्णपणे सुरळीत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

गोंधळाचे वातावरण; प्रवाशांच्या तक्रारी

रविवारी सव्वाबारा-साडेबाराच्या सुमारास पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेवरील गाड्या फलाटावरच थांबवण्यात आल्या. स्थानकांवरील वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे लिफ्ट, सरकते जीने आदी व्यवस्थाही बंद होती. मेट्रो गाड्या तांत्रिक अडचणी उशिरा सोडण्यात येणार असल्याची माहिती सुरक्षारक्षक देत होते. मेट्रो सुरू झाल्यावर पिंपरी-चिंचवडकडून मंडई स्थानकावर तुडुंब भरलेली मेट्रो आली. सगळ्यांनीच सरकत्या जिन्याकडे धाव घेतली. त्यात काहीजण पडले, कोणाचा पाय अडकला. किंचाळ्या, धावपळ आणि गोंधळ असे वातावरण स्थानकावर होते. सुरक्षारक्षक घाई करू नका, असे सांगत होते. पण एकही प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आज मोठा अपघात होता होता वाचला, अशी भावना एका प्रवाशांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.