पुणे : यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांनी पुणे मेट्रोला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. १४ ते २५ सप्टेंबर या १२ दिवसांच्या कालावधीत ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यातून पुणे मेट्रोला ७ कोटी ४९ लाख २८ हजार ३७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवर २५ लाख १५ हजार ५१६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून ४ कोटी १७ लाख ४६ हजार ६२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर वनाज ते रामवाडी या मार्गिकेवर २३ लाख १७ हजार ३९९ प्रवाशांची नोंद झाली. तर ३ कोटी ३१ लाख ८१ हजार ७५१ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली. जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानकावर १० लाख ३९ हजार ४५२ प्रवाशांनी मार्गिका बदलली.
दोन वर्षांत दुप्पटीहून अधिक प्रवासी
पुणे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. २०२४ च्या गणेशोत्सवात मेट्रोने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या २० लाख ४५ हजार १०० इतकी होती. त्यात वाढ होऊन २०२५ मध्ये ३७ लाख १७ हजार ५७८ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. यंदा गणेशोत्सवातील प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, २०२६ च्या गणेशोत्सवात ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. २०२४ च्या तुलनेत यंदा गणेशोत्सवातील प्रवासी संख्येत तब्बल १३६.३२ टक्क्यांची वाढ झाली असून, पुणे मेट्रोची प्रवासी संख्या गेल्या दोन वर्षांत दुप्पटीहून अधिक झाली आहे.
गणेशोत्सवातील मेट्रोच्या प्रवाशांची आकडेवारी
स्थानक : प्रवासी : उत्पन्न
– महात्मा फुले मंडई : ६,८२,४७३ : १,०१,८५,२५५
– पीसीएमसी : ४,७२,६५८ : ९९,६९,८४९
– स्वारगेट : ४,३५,४८९ : ६३,२२,२१३
– रामवाडी : ४,०५,४४७ : ६५,९५,००८
– पीएमसी : २,६९,४७७ : ३७,४६,१६१
‘प्रवाशांची संख्या अभूतपूर्व’
‘गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांनी पुणे मेट्रोवर दर्शवलेला विश्वास आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. उत्सव काळात प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन गाड्यांची वारंवारता दर ५ मिनिटांवर आणणे, २४ तास अखंडित सेवा देणे, स्थानकांवर चोख व्यवस्थापन ठेवणे आणि होणारी गर्दी लक्षात घेता स्वारगेट, महात्मा फुले मंडई व डेक्कन जिमखाना या मेट्रो स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, यामुळे हा ऐतिहासिक प्रवास सुलभ व सुरक्षित होऊ शकला. पुणेकरांनी आणि बाहेरून आलेल्या भाविकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत डिजिटल तिकीट प्रणालीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, त्याबद्दल मी सर्व प्रवाशांचे मनापासून आभार मानतो,’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले.
