पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणांतर्गत वनाज ते चांदणी चौक या उन्नत मार्गिका प्रकल्पाला गती दिली आहे. सुमारे १.१२ किलोमीटर लांबीच्या विस्तारीकरणासाठी महामेट्रोकडून १८ ऑक्टोबर रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून २६ नोव्हेंबर रोजी निविदा खुल्या करण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी कोथरूड डेपो येथे दुहेरी उड्डाणपूल (डबलडेकर फ्लायओव्हर) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे पौड रस्ता आणि चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच मुंबई-बेंगळुरू महामार्गाशी जोडणारा ५८० मीटर लांबीच्या उन्नत पादचारी पुलाला जोडण्यात येणार असल्याने पादचारी सुरक्षिततेलाही चालना मिळणार आहे.
शहरातील मेट्रो मार्गिकेच्या वनाज ते चांदणी चौक या मार्गिका विस्ताराला मार्च २०२४ मध्ये राज्य सरकारकडून राज्यस्तरीय मंजुरी मिळाली, तर जून २०२५ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिली. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजूर केला होता. त्यानुसार केंद्रीय मंजुरीनंतर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. २६ नोव्हेंबरला निविदा खुल्या करण्यात येणार असून पात्र कंपनीच्या निकषांनुसार मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे संचालक (व्यवस्थापन विभाग) अतुल गाडगीळ यांनी दिली.
या प्रकल्पात कोथरूड बस डेपो आणि चांदणी चौक असे दोन नवीन मेट्रो स्टेशन असतील. दुहेरी उड्डाणपुलाच्या सर्वात वरील (दुसऱ्या) स्तरावरून मेट्रो, तर मधला स्तर वाहनांसाठी असेल. ज्यामुळे अतिरिक्त जमीन संपादनाची गरज भासणार नसून बांधकाम जलद होण्याच्या दृष्टीने नियोजन केले असल्याचे, गाडगीळ यांनी नमूद केले.
शहरात तिसरा दुहेरी उड्डाणपूल
यापूर्वी पुणे विद्यापीठ चौक (एसएसपीयू) आणि नळ स्टॉप (एसएनडीटी) या दोन ठिकाणी असे डबल-डेकर उड्डाणपूल बांधले गेले आहेत. पौड रोड आणि चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोंडी दूर करण्यासाठी हाच यशस्वी प्रयोग कोथरूड डेपो येथे राबवला जाणार आहे. प्रकल्पाचा खर्च प्रथम महामेट्रो करणार आहे. आवश्यकता भासल्यास पुणे महापालिकेकडून (पीएमसी) निधी घेतला जाईल.
स्थानिकांना फायदा
कोथरूड डेपो परिसरात रस्त्याची रुंदी पुरेशी असल्याने बांधकामात अडचणी येणार नाहीत, या दृष्टीने विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारामुळे भुसारी कॉलनी, बावधन आणि पिरंगुटसारख्या वाढत्या निवासी भागांना मेट्रो सुविधा मिळेल, ज्यामुळे दैनंदिन प्रवास सुलभ होईल.
