पुणे : शहरातील वाढत असलेली वाहनांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपयोजना करण्यास सुरुवात केली आहे. पीएमपीएमएल चे सक्षमीकरण, मेट्रोचे विस्तारीकरण असे अनेक उपाय केले जात आहेत. शहरातील दोन मार्गावर मेट्रो प्रकल्प सुरू झाल्याने मेट्रोचा वापर करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे.

नागरिकांकडून मेट्रोचा वापर केला जातो. पण अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशनपासून घरापर्यंत जाण्यासाठी आवश्यक ती फिडर सेवा उपलब्ध नसल्याने नागरिक दुचाकी वाहन घेऊन मेट्रो स्टेशनपर्यंत येतात. मात्र गाडी लावण्यासाठी पार्किंग उपलब्ध होत नसल्याने अडचणी येतात. त्यामुळे अनेक नागरिक मेट्रो ऐवजी खासगी वाहनाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

नागरिक मेट्रो स्टेशन वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मेट्रोचा वापर करण्याचे प्रमाण वाढणार आहे. याचा सर्वंकष अभ्यास करून मेट्रो स्थानकांच्या परिसरात प्रवाशांची वाहने उभी करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या मालकीच्या ३१ जागांवर पार्किंग विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेच्या प्रकल्प विभागातील मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी ही माहिती दिली.

नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, या उद्देशाने पीएमपी बससेवेबरोबरच शहरात मेट्रो मार्ग तयार करण्यात आले. सध्या शहरात दोन मार्गांवर मेट्रो धावत आहे. मात्र, मेट्रो स्थानक परिसरात वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना जागा नसते. पार्किंगची सोय नसल्याने अनेक प्रवासी वाहनाचाच पर्याय स्वीकारतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे म्हणाले, ‘मेट्रो स्थानकाजवळ ३१ ठिकाणी पार्किंग व्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या मालकीच्या शहरातील ३४ मोकळ्या जागांची पाहणी महापालिकेने केली आहे. त्यातील ३१ ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था विकसित झाल्यानंतर मेट्रो स्थानकांच्या परिसरात वाहने लावण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मेट्रोचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढेल.’

पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, शहरात दोन मार्गांवर मेट्रो सुरू झाली असून, शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या तिन्ही मार्गांचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी, यासाठी महापालिकेने मेट्रो स्थानकाच्या परिसरात असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या जागा शोधल्या आहेत. तेथे पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका, वनाज ते रामवाडी तसेच पुढील काही महिन्यांमध्ये सुरू होणाऱ्या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गावरील मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या जागांवर ही पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. याचा फायदा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार असल्याचा विश्वास महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.