Pune Metro Update : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाचे छत गळत असल्याचे समोर आले आहे. तर, काही मेट्रो स्थानकांमध्ये पावसाचे पाणी ये-जा करण्याच्या ठिकाणी येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, देखभाल-दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आले.
मंगळवारी (७ जुलै) स्वारगेट स्थानकातील काही भागांत छतातून पाणी झिरपत असल्याचे दिसून आले. गळतीमुळे पाणी साचू नये म्हणून काही ठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या, खबरदारी म्हणून सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाचे छत गळत असल्याने करोडो रुपये खर्च करून केलेल्या मेट्रोच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर, गळणारे पाणी साचू नये म्हणून या मेट्रो स्थानकात बादल्या ठेवण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, मेट्रोच्या कामांवर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘मेट्रोची छतगळती नवीन नाही’
‘आजची गळती नवी नाही. १० एप्रिल २०२४ लाही अशाच प्रकारच्या पावसाच्या गळतीची तक्रार केलेली. मागच्या पावसाळ्यातही काही स्थानकांमध्ये गळती झालेली. कोणत्याही प्रकल्पाची किमान २५ वर्षे, ५० वर्षे अशी कालमर्यादा असते. आता तिसऱ्याच पावसाळ्यात ही वेळ येत असेल, तर कामांच्या गुणवत्तेत हेळसांड झाली, यात शंकाच नाही. आता निदान पुढच्या प्रकल्पांमध्ये तरी अशा चूका दुरूस्त केल्या जातील का, हा प्रश्न आहे,’ असे वाहतुक अभ्यासक संजय शितोळे यांनी सांगितले.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे काय ?
‘आता स्वारगेट स्थानकावर देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होतील, परिस्थिती सुरळीत होईल,’ असे महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले.
