पुणे : दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईनंतर आता पुणेकरांचा मेट्रो प्रवास आणखी सोपा होणार आहे. तिकिटासाठी प्रवाशांना लांबचलांब रांगेत थांबण्याची आवश्यकता यापुढे भासणार नाही. याचबरोबर तिकिटावर त्यांना सवलतही मिळणार आहे. पुणे मेट्रो प्रवासाचे तिकीट यापुढे उबर ॲपवरून बुक करता येणार आहे. या क्यूआर कोड आधारित तिकिटामुळे प्रवाशांचा मेट्रो प्रवास अधिक सुकर होणार आहे.
पुणे हे उबरच्या मेट्रो तिकीट सेवेसाठी देशातील पाचवे शहर ठरले आहे. यापूर्वी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. वाढती वाहतूक कोंडी, वेळेची बचत आणि डिजिटल सेवांचा वाढता वापर लक्षात घेता उबरने पुण्यात ही सेवा सुरू केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात उबर अॅपवरून मेट्रो तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना मर्यादित कालावधीसाठी ५० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीची कमाल मर्यादा १० रुपयांपर्यंत लागू असेल. त्यामुळे रोजच्या प्रवासात पुणेकरांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. तिकीट बुकिंगसाठी प्रवासी यूपीआयद्वारे पेमेंट करू शकतात. मेट्रो प्रवास पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवासासाठी उबर ऑटो, बाईक, गो यांसारख्या सेवाही त्याच अॅपमधून सहज उपलब्ध असतील. कंपनीने पुढील काळात देशातील आणखी शहरांमध्येही ही सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
ही सेवा केंद्र सरकारचा डिजिटल पायाभूत प्रकल्प ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सच्या (ओएनडीसी) माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. ओएनडीसीमुळे सार्वजनिक वाहतूक आणि लास्ट-माईल मोबिलिटी एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडली जात आहे. ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विभोर जैन यांनीही या भागीदारीला स्मार्ट आणि टिकाऊ सार्वजनिक वाहतुकीकडे मोठे पाऊल असे संबोधले. पुण्यात वाढत्या आयटी कर्मचारी वर्गामुळे आणि रोजच्या वाहतूक कोंडीमुळे स्मार्ट ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्सची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत उबर आणि मेट्रोचे हे एकत्रीकरण शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारे मानले जात आहे.
एक कोटीहून अधिक तिकिटे
उबरसोबतचे हे एकत्रीकरण पुणेकरांसाठी अधिक सोयीचे ठरेल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यास मदत करेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले. उबर इंडियाच्या नेहा कपूर यांनी सांगितले की, मेट्रो तिकीट सेवा आणि लास्ट-माईल ट्रान्सपोर्ट एकाच अॅपमध्ये आणल्यामुळे नागरिकांचा रोजचा प्रवास अधिक सोपा आहे. देशभरात आतापर्यंत एक कोटींहून अधिक मेट्रो तिकिटे उबरमार्फत बुक करण्यात आली आहेत.
उबरवरून मेट्रो तिकीट कसे बुक कराल?
- उबर अॅप उघडा.
- होमस्क्रीनवरील मेट्रो पर्याय निवडा.
- प्रवासाची सुरुवातीची आणि अंतिम स्थानके निवडा.
- यूपीआयद्वारे पेमेंट करा.
- क्यूआर तिकीट स्कॅन करून थेट प्रवास सुरू करा.
