पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार ४२६ झाडे तोडली. त्याबदल्यात शहराच्या वेगवेगळ्या भागांत महामेट्रोकडून १४ हजार १३४ झाडे लावण्यात आली. मात्र, या झाडांच्या सद्यस्थितीबाबत महामेट्रोकडे माहिती नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मात्र, तीन वर्षांच्या देखभाल-दुरुस्ती कालावधीत सर्व झाडे जिवंत होती, असे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महामेट्रोकडून लावण्यात आलेल्या झाडांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यावर उत्तर देताना महामेट्रोने झाडांच्या सद्यस्थिबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या झाडांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च एकूण प्रकल्पांतच समाविष्ट करण्यात आला होता. त्यामुळे त्यासाठीच्या खर्चाचा तपशीलही उपलब्ध नसल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार ४२६ झाडे बाधित झाली. त्याबदल्यात १४ हजार १३४ झाडे लावण्यात आली. लोणावळा, मगरपट्टा सिटी, वाघोली, पाषाण पंचवटी, आकुर्डी मेट्रो इको पार्क, तळजाई टेकडी, आयटीआय औंध, आळंदी जीआरईएफ सेंटर, डेक्कन कॉलेज, खडकी कटक मंडळ आदी ठिकाणी महामेट्रोकडून वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, या झाडांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती महामेट्रोकडे उपलब्ध नाही. तसेच झाडांच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चाचा वेगळा तपशील ठेवला जात नाही. हा खर्च संबंधित कामाच्या कंत्राटातच समाविष्ट असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झाडे तोडल्याबद्दल वृक्ष कायद्यानुसार दंडात्मक कारवाई झाली का, या प्रश्नावर आतापर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, लावलेल्या झाडासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे १० हजार रुपये सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्यात आल्याचे महामेट्रोकडून नमूद करण्यात आले आहे.

मेट्रोच्या प्रकल्पांसाठी शहरातील झाडे सर्रास तोडली जातात. त्याबदल्यात कुठे तरी हजोरो झाडे लावल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र झाडांची सद्यस्थिती काय, ही झाडे खरेच जगली का, याची माहिती महामेट्रोने दिली नाही. आता १३९ झाडांवर नव्याने कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. त्याबदल्यात ३ हजार ५० झाडे लावण्याचे आश्वासन महामेट्रोने दिले आहे. या झाडांची निगा राखली जाणार का? त्यातील किती झाडे किमान वर्षभर तरी जगतील, याची कल्पना करणेही अवघड आहे. – तुषार रत्नपाल, माहिती अधिकार कार्यकर्ते

महामेट्रोकडून लावण्यात आलेल्या झाडांच्या देखभाल-दुरुस्तीचा कालावधी तीन वर्षे होता. महामेट्रोने या कालावधीत व्यवस्थित देखभाल घेतली. त्यामुळे लावलेली सर्वच्या सर्व झाडे जिवंत होती. – चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो