पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवार पेठेत कूपनलिका खोदताना भूमिगत मेट्रो मार्गामध्ये पाण्याची गळती झाल्याच्या घटनेची महापालिकेने गंभीर दखल घेतली असून, या भागात बांधकाम करण्यासाठी आता नवीन नियमावली करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. भूमिगत मेट्रो मार्ग परिसरात विशेषतः कूपनलिका खोदताना स्वतंत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.
मध्यवर्ती भागांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भूमिगत मेट्रो तयार करण्यात आली. मात्र, या ठिकाणी करण्यात येत असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे मेट्रो प्रकल्पासमोरच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रो मार्गांवरील जुन्या इमारती, वाडे यांचा पुनर्विकास करताना आणि नवीन बांधकामे करताना कडक नियम तयार केले जाणार आहेत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
शुक्रवार पेठ परिसरात तीन दिवसांपूर्वी खडक पोलीस ठाण्यासमोर एका वाड्यात कूपनलिका घेण्यासाठी खोदकाम केले जात होते. या कामामुळे मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावरील मेट्रोच्या बोगद्यात पाणीगळती झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित घरमालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
या घटनेची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून, मेट्रो मार्गाच्या आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे मेट्रोच्या सेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी बांधकाम परवानगी देताना विशेष काळजी घेण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार करण्याचा विचार महापालिकेने सुरू केल्याचे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले. भूमिगत मेट्रोचा मार्ग जात असलेल्या भागांत बांधकाम करताना वेगळ्या तांत्रिक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.
बांधकाम करताना विशेषतः कूपनलिका खोदकामासाठी भूजल विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. आतापर्यंत बांधकाम परवानगी घेताना अनेक ठेकेदार एकाच परवानगीच्या आधारे कूपनलिका खोदकामही करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, यापुढे प्रत्येक प्रक्रियेसाठी स्वतंत्र मंजुरी आवश्यक असेल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बाबतची नियमावली तयार करून त्यानुसारच परवानगी देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
या नियमावलीत बांधकामांच्या तांत्रिक बाबी, सुरक्षित अंतर, कंपन नियंत्रण, तसेच मेट्रो संरचनेवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर विचार केला जाणार आहे. या उपाययोजनांमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच नागरिकांच्या पुनर्विकासाच्या गरजाही लक्षात घेतल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहरातून धावणाऱ्या भुयारी मेट्रोला कोणताही धोका होणार नाही, यासाठी लवकरच नवीन नियमावली तयार केली जाणार आहे. त्यामधील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहणार आहे.
