पुणे : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भूमिगत मेट्रो मार्गाजवळ कूपनलिकेची खोदाई करताना बोगद्यातील पाणीगळती प्रकरणात घरमालकासह ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश आर. आर. मेढे यांनी फेटाळून लावला.

‘घरमालक आणि ठेकेदाराने मेट्रो मार्गिकेच्या परिसरात कूपनलिका खोदून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास ते तपासाला बाधा पोहोचवू शकतात’, असे जिल्हा सरकारी वकील बोंबटकर यांनी युक्तिवादात नमूद केले. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून घरमालकासह ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

छत्रपती शिवाजी महाराज रस्ता परिसरात पिंपरी ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रो आहे. शुक्रवार पेठेतील खडक पोलीस ठाण्यासमोर एका घरमालकाने कूपनलिका खोदण्याचे काम सुरू केले हाेते. जुना वाडा पाडून तेथे कूपनलिका खोदण्याचे काम सुरू होते. १४ मार्च रोजी कूपनलिकेचे खोदकाम करताना मेट्रो मार्गिकेच्या बोगद्याला छिद्र पडले आणि पाणीगळती सुरू झाली. मेट्रो अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्वरित गळती रोखण्यात आली.

नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी; तसेच महामेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी घरमालक आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी घरमालक, तसेच ठेकेदाराने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला.