Baba Bhide Bridge Pune Traffic Update: मेट्रोच्या कामांसाठी बाबा भिडे पूल अधे-मधे सारखा बंद करण्यात येत असल्याने मध्य पुण्यातून डेक्कन परिसरात जाणाऱ्यांची गैरसोय होते. मेट्रोचे काम कधी संपेल, याचे निश्चित उत्तर मिळत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.

वर्षानुवर्षे रेंगाळणाऱ्या कामांमुळे आधीच कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मेट्रोच्या कामांसाठी बाबा भिडे पूल अधे-मधे सारखा बंद करण्यात येत असल्याने सदाशिव पेठ, नारायण पेठेतून डेक्कन परिसरात ये-जा करणाऱ्यांना थोडे अधिकचे अंतर कापावे लागते. बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बाबा भिडे पूल नियमितपणे कधी सुरू होणार, असा सवाल पुणेकर उपस्थित करतात.

शहरे वेगाने वाढत आहे. वाहनांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. रस्ते रुंद करणे, पूल बांधणे, कॅमेरे बसवणे इत्यादी गोष्टी गरजेच्या आहेत. त्यासाठी नागरिकांना किती दिवस वेठीस धरले लागणार, याचे नियोजनही अपेक्षित असते. प्रत्यक्षात काम सुरू झाले, की ते अनेक वर्षे रेंगाळते. प्रशासनाकडून आश्वासने देण्यात येतात. काम संपत नाही; पण नागरिकांना कोंडीत अडकावे लागते. आता मेट्रोच्या कामांसाठी बाबा भिडे पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात येते. असे असूनही मेट्रोच्या पुलाचे काम बराच काळ सुरूच आहे. अजूनही ते अपूर्ण असल्याचेच दिसते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठीचा सोयीचा असलेला मार्ग बंद होतो. कित्येकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

मेट्रोच्या पुलाचे काम पूर्ण झाल्यास अनेक नागरिकांना दिलासा मिळेल. परिसरातील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. त्यासाठी पुणे महापालिकेने मेट्रो व्यवस्थापनाशी चर्चा करून मेट्रोच्या पुलाचे काम कधी पूर्ण करण्यात येईल आणि बाबा भिडे पुलावरील बॅरिकेड कधीपर्यंत काढले जातील, याची माहिती जाहीर करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची सफाई करा

शहराच्या मध्य वस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. हा कचरा पावसाळ्यापूर्वी साफ होणे गरजेचे आहे. डेंगळे पूल ते म्हात्रे पुलापर्यंत नदीपात्राचा भाग अत्यंत अस्वच्छ आहे. पावसाळ्याआधी हा कचरा न हलविल्यास परिसरात अस्वच्छता होते, रोगराई पसरते. हा कचरा पावसाने नदीपात्रात वाहून जातो. पुण्याजवळच्या गावातून वाहताना तो नदीत अडकतो. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. कवडीपाट येथे अशाच अडकलेल्या कचऱ्यामुळे परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर कमी झाले. पुणे महापालिकेने या प्रश्नांवर तातडीने कारवाई करून नदीपात्रातील कचरा साफ करणे गरजेचे आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचे साहित्य पडले असून, त्याला गंज लागून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे साहित्य हलविणेही गरजेचे आहे. – संदीप खर्डेकर, अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन

दररोजच्या जीवनात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, प्रश्न, प्रशासनाकडून अपेक्षा याबाबत तुमचे अनुभव ‘लोकसत्ता’कडे पाठवू शकता. यामध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनादेखील नागरिक सुचवू शकतात. यातील महत्त्वाच्या पत्रांची दखल घेऊन त्याला ‘लोकसत्ता’च्या तगादा सदरामध्ये प्रसिद्धी दिली जाईल.

तुमच्याही समस्या पाठवा : lokpune4@gmail.com