पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांचा वेगाने विस्तार होत असताना तेथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पावले उचलली आहेत. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रात ‘एमआयडीसी’ने ४३७ कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

‘एमआयडीसी’ने चाकण आणि तळेगावमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे. ‘एमआयडीसी’ने एकूण ४३७ कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प हाती घेतले. त्यातील काही प्रकल्प पूर्ण झाले असून, काही प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. चाकणमधील टप्पा क्रमांक दोनमधील ५.५० किलोमीटरच्या चारपदरी मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी ४३.११ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन मीटर डांबरी सेवा रस्ते करण्यात आले आहेत. तळवडे आयटी पार्क ते चाकण हा ३.५ किलोमीटरचा सहा पदरी काँक्रीट रस्ता पदपथांसह तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. यासाठी ६४.९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फोक्सवॅगन ते आळंदी फाटा या ५.७० किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हा चार पदरी रस्ता असून, दोन्ही बाजूंना दोन मीटरचे सेवा रस्ते असतील. हे काम ५९.२६ कोटी रुपयांचे असून, त्याचा कार्यादेश काढण्यात आला आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक एक व दोनमधील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता चार पदरी असेल आणि दोन्ही बाजूंना दोन मीटरचे सेवा रस्ते असतील. या रस्त्याची एकूण लांबी १४.६५ किलोमीटर असून, त्यासाठी १३७.१९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्याचे काम सुरू आहे. टप्पा क्रमांक पाचमधील ४.४ किलोमीटरच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी १०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, काम सुरू आहे. तळेगावमधील टप्पा क्रमांक दोनमधील १.७ किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी २६ कोटींचा खर्च असून, हे कामही सुरू आहे.

उद्योगांची आग्रही मागणी

पुणे जिल्ह्यातील चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रे वाहन उद्योगासाठी महत्त्वाची आहेत. या दोन्ही औद्योगिक क्षेत्रांत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प आहेत. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधांबाबत उद्योगांकडून ओरड केली जात आहे. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांच्याकडूनही याबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी संघटनेकडून सातत्याने केली जात होती.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी ‘एमआयडीसी’कडून पावले उचलण्यात आली आहेत. अनेक रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याचबरोबर जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला थेट पुणे-नाशिक महामार्गाशी तळेगाव-चाकणमार्गे जोडणारा मार्ग लवकरच पूर्ण होईल. – नीलेश मोढवे, अधीक्षक अभियंता, एमआयडीसी