पुणे : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बॅटरीवर चालणारे, देशातील सर्वांत मोठे रेडिओ नियंत्रित विमान तयार केले आहे. ४८ लाख रुपयांमध्ये विद्यार्थ्यांनी या विमानाची निर्मिती केली असून, तिसऱ्या प्रयत्नात या विमानाने उड्डाण आणि जमिनीवर उतरण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. कुलगुरू डॉ. राजेश एस., तंत्रज्ञान प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, नवोन्मेष प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे या वेळी उपस्थित होते. अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, एरोस्पेस विभागप्रमुख डॉ. कमलेश कुलकर्णी, डॉ. सुनील डिंगरे, तसेच ‘सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स’चे (क्रिया) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष दराडे, स्काय डायव्हर शीतल महाजन, कॅप्टन अमोल यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘टीम स्कायट्रेक’ने सतीश काचे या विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली ‘प्रोजेक्ट गरुडा’अंतर्गत या विमानाची निर्मिती केली. त्यासाठी विद्यापीठाच्या ‘क्रिया’च्या वतीने ४८ लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. यशस्वी उड्डाणानंतर या विमानाची आता ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली आहे.
विमानाची रचना, तांत्रिक आरेखन, विमानावरील तांत्रिक प्रणालीपर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनीच केली. गेल्या चार वर्षांत विद्यार्थ्यांनी प्रोपल्शन सिस्टीम, स्ट्रक्चरल डिझाइन, फ्लाइट कंट्रोलर ट्युनिंग, प्रतिकूल हवामान, धावपट्टीच्या मर्यादा, अपयशी चाचण्या अशा अनेक आव्हानांना सामोरे जात अखेरीस ४ मे रोजी धुळे येथील धावपट्टीवर विमानाची यशस्वी चाचणी घेतली. भविष्यात ‘टीम स्कायट्रेक’ या प्रकल्पाच्या माध्यमातून ई-व्हिटॉल इलेक्ट्रिक एअर टॅक्सी, स्वॉर्म-ड्रोन सिस्टीमसाठी मदरशिप प्लॅटफॉर्म, संरक्षण आणि नागरी वापरासाठी प्रगत मानवरहित विमान (यूएव्ही) संशोधन व्यासपीठ विकसित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
प्रोजेक्ट गरुडा हे अनुभवाधारित आणि नवोन्मेषप्रधान शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी वर्गातील ज्ञानाचा वापर करून संशोधन, चिकाटी आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर मोठी कामगिरी साध्य केली आहे. अशा प्रकल्पांमधून देशाचे भावी एरोस्पेस तज्ज्ञ आणि संशोधक घडतील. – डॉ. मंगेश कराड, कार्याध्यक्ष, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठ
‘गरुडा’ची वैशिष्ट्ये
- वजन – २६१ किलो
- विमानाचे पंख – ९.२५ मीटर
- उड्डाणासाठी (टेक-ऑफ) आवश्यक अंतर – २०० मीटर
- उड्डाण क्षमता – १० मिनिटे
- कमाल उंची – १०० मीटर
- वजन पेलण्याची क्षमता – १०० किलोग्रॅम
- कमाल वेग – ८० किमी प्रतितास
