पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली. काकडे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नाराजीनाट्य घडले. माजी आमदार, शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘राष्ट्रवादी’त वाद सुरू असताना भाजपकडून इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
टिंगरे यांचा पर्यायी (डमी) अर्ज असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. चार जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतरच या मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या मतदार संघातील उमेदवारीवरून सुरुवातीला भाजप आणि ‘राष्ट्रवादी’ यांच्यात चुरस होती. ही जागा ‘राष्ट्रवादी’ची असली, तरी भाजपने या जागेवर दावा केला. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी अंतिम मुदत असताना उमेदवारीबाबत ‘राष्ट्रवादी’त शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली. भाजपचे माजी खासदार संजय काकडे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. त्यानंतर खासदार काकडे आणि त्यांचे पुत्र विक्रम काकडे या दोघांनी सोमवारी ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेच्या (शिंदे) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मुरलीधर मोहोळ, युवा नेते जय पवार उपस्थित होते.
काकडे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’मध्ये नाराजी पसरली. माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही उमेदवारीसाठी आग्रह धरला. त्यानंतर त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
टिंगरेंचा पर्यायी अर्ज
‘पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे असून, टिंगरे हे पर्यायी (डमी) उमेदवार आहेत. मुख्य उमेदवार आणि त्याला पर्यायी उमेदवार देण्याची तरतूद आहे. मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार हा पक्षाचा अधिकृत उमेदवार होतो. विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत,’ असे ‘राष्ट्रवादी’चे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या आदेशानंतर श्रीकांत पाटील उमेदवार
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार श्रीकांत पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पर्यायी उमेदवार म्हणून तुषार कामठे यांनी अर्ज भरला आहे.
प्रदीप कंद अर्ज मागे घेणार का?
भाजपकडून जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, ही जागा ‘राष्ट्रवादी’कडे गेल्याने कंद यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कंद हे अर्ज मागे घेणार का, या बाबत उत्सुकता असणार आहे.
