पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे सोमवारी (५ ऑक्टोबर) अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी स्पष्ट झाले. भाजपकडून डाॅ. स्मिता जाधव यांनी तर शिवसेनेकडून (शिंदे) उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, पदवीधरसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार)  हर्षदा देशमुख-जाधव यांनी अर्ज भरला आहे. महायुतीमधील बंडखोरी थांबल्यास पदवीधरसाठी डाॅ. स्मिता जाधव आणि हर्षदा जाधव अशी सरळ लढत होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरसाठी भाजपकडून डाॅ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदार संघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये डाॅ. जाधव यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जाधव आणि गावडे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

पदवीधरसाठी शिवसेनेकडून (शिंदे) उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचेही स्पष्ट झाले.

शरद लाड यांचा ‘डमी’ अर्ज?

दरम्यान, गेल्या वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद लाड यांना भाजपकडून पदवीधर मतदारसंघामधून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. मात्र, ऐन वेळी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शरद लाड यांनीही सोमवारी अर्ज दाखल केला. ‘लाड यांचा उमेदवारी अर्ज ‘डमी’ म्हणून दाखल करण्यात आला आहे. भाजपमध्ये बंडखोरी होणार नाही,’ असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

गावडे यांचा अर्ज दाखल

शिक्षक मतदारसंघासाठी भाजपकडून कौस्तुभ गावडे यांनी अर्ज दाखल केला असून, शिवसेनेकडून (शिंदे) मंगेश चिवटे हे आज, मंगळवारी (६ ऑक्टोबर) अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. चिवटे यांना अधिकृत ‘एबी’ फाॅर्मही देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या मतदारसंघातही बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेस गेल्या निवडणुकीतील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या नावाची घोषणा झाली असून, ते आज, मंगळवारी काँग्रेसकडून अधिकृत अर्ज भरणार आहेत.  शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. येत्या शुक्रवारी (९ ऑक्टोबर) अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवाराची अर्जांची माहिती

पुणे पदवीधर मतदारसंघ : २९ उमेदवार ३३ अर्ज

पुणे शिक्षक मतदारसंघ : ३१ उमेदवार ३८ अर्ज