पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा उमेदवार कोण असणार आणि भाजप उमेदवार उभा करणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप या महायुतीतील मित्रपक्षांकडून दावा करण्यात येत असताना महाविकास आघाडीने श्रीकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष आहेत.

त्यांनी बोपोडी भागातून नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांचे वडील वि. भा. पाटील हे १९६९ मध्ये पुण्याचे महापौर होते. तसेच १९७७ मध्ये ते पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. आता श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या मतदार संघात ८६७ मते आहेत. त्यामध्ये पुणे महापालिकेतील १६५ नगरसेवक आणि १० स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषदेत निवडून आलेले ७३ सदस्य आणि १३ नियुक्त केलेले सदस्य आहेत.

नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये सर्वाधिक ४३२ निवडून आलेले सदस्य आणि ४३ नियुक्त केलेले सदस्य आहेत. पुणे, देहूरोड आणि खडकी कॅन्टान्मेंट बोर्डात प्रत्येकी एक नियुक्त सदस्य आहे. त्यांपैकी ‘राष्ट्रवादी’ने त्यांच्याकडे ३७० मते असल्याचा, तर भाजपने ३३३ मते खात्रीची असल्याचा दावा केला आहे.

‘उमेदवारी मागे घेऊ नये’

‘या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून इच्छुक होतो. मात्र, पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये,’ असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले.