पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांनी प्रतिज्ञापत्रात कोणतीही सरकारी थकबाकी नसल्याची माहिती दिली होती; पण त्यांच्याकडे पुणे महापालिकेचा मालमत्ताकर थकीत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवाराने केल्यावर काकडे यांनी ३९ हजार रुपयांचा थकीत मालमत्ता कर घाईने ‘ऑनलाइन’ भरला. त्यावरून दोन्ही ‘राष्ट्रवादी’त वादाची ठिणगी पडली.

दोन्ही ‘राष्ट्रवादी’त आरोप-प्रत्यारोप होत असताना निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील यांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकीत असणे, हा नामनिर्देशनपत्र नाकारण्याचा वैध आधार नसल्याचे स्पष्ट करून आक्षेप फेटाळला. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने घेतला.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उमेदवार आहेत. उमेदवारी अर्जांची मंगळवारी छाननी करण्यात आली. त्या वेळी काकडे यांच्याकडे पुणे महापालिकेचा मालमत्ताकर थकीत असल्याने त्यांचा अर्ज अपात्र करण्याबाबतची तक्रार श्रीकांत पाटील यांच्या वतीने सुहास उभे यांनी निर्णय अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे नोंदविली.

ही बाब लक्षात येताच काकडे यांनी सुमारे ३९ हजार रुपयांचा मालमत्ताकर ‘ऑनलाइन’ भरला. उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी मालमत्ताकराचा भरणा करण्यास श्रीकांत पाटील यांनी आक्षेप घेऊन काकडे यांचा अर्ज अपात्र करण्याची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील यांनी महापालिकेचा मालमत्ता कर थकीत असणे, हा नामनिर्देशनपत्र नाकारण्याचा वैध आधार नसल्याचे स्पष्ट करून आक्षेप फेटाळला. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला.

काकडे यांनी प्रतिज्ञापत्रात कोणताही कर थकीत नसल्याची माहिती दिली. छाननी सुरू असताना सकाळी साडेअकरा वाजता ‘ऑनलाइन’ ३९ हजार रुपयांचा करभरणा करण्यात आला. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप आहे. याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत. श्रीकांत पाटील, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

सदनिकेची २०२२ मध्ये विक्री

महापालिकेच्या हद्दीतील संबंधित सदनिकेची १७ जून २०२२ रोजी विक्री करण्यात आली. त्यामुळे करभरणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे विक्रम काकडे यांनी स्पष्ट केले. या बाबतची माहिती त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे दिली आहे.

छाननीत एक अर्ज बाद

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, तुषार कामठे आणि रणजीत जरे यांचे अर्ज अपक्ष म्हणून पात्र करण्यात आले. उमेश म्हेत्रे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे आता पाटील, काकडे यांच्यासह सहा उमेदवार राहिले आहेत. चार जून रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.