scorecardresearch

पुणे : मृत्युशय्येवरील बीआरटी मार्गासाठी पुन्हा लाखोंची उधळपट्टी, सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिका करणार ८१ लाख खर्च

सातारा बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेसाठी तब्बल ७५ लाख रुपये खर्च केल्यानंतर आता बीआरटी मार्ग सुशोभीकरणासाठी नव्याने ८१ लाखांचा खर्च केला जाणार आहे.

पुणे : मृत्युशय्येवरील बीआरटी मार्गासाठी पुन्हा लाखोंची उधळपट्टी, सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिका करणार ८१ लाख खर्च
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : शहरातील बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी मार्ग मृत्युशय्येवर असताना आणि काही मोजक्या अंतरातच बीआरटीची सेवा सुरू असतानाही बीआरटी मार्गात सुधारणेच्या नावाखाली महापालिका प्रशासनाची उधळपट्टी कायम राहिली आहे. सातारा बीआरटी मार्गाच्या पुनर्रचनेसाठी तब्बल ७५ लाख रुपये खर्च केल्यानंतर आता बीआरटी मार्ग सुशोभीकरणासाठी नव्याने ८१ लाखांचा खर्च केला जाणार आहे. या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे.

सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाची दोन वर्षांपूर्वी पुनर्रचना करण्यात आली. त्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला. वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन सायकल मार्ग आणि सेवा रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली. बसथांब्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. पुनर्रचनेची कामे रखडल्याने बीआरटी मार्गही नियोजित वेळेत सुरू करण्यात आला नव्हता. तसेच, सातारा रस्ता बीआरटीसाठी महापालिकेने सल्लागाराचीही नियुक्ती केली होती. त्यासाठीही स्वतंत्र खर्च करण्यात आला होता. शेकडो कोटींच्या उधळपट्टीनंतरही महापालिकेला हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मार्गाचे सक्षमीकरण करण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरू आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मार्गात सुधारणा आणि काही ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी ८१ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.

हेही वाचा – ‘क्विन’ आजीबाईंची कमाल! ८३ व्या वर्षी कॅरम स्पर्धेत जिंकलं सुवर्ण, एकेरीत कांस्यपदकावरही मारली बाजी, पाहा Video

शहरात सध्या स्वारगेट ते कात्रज हा एकमेव बीआरटी मार्ग सुरू आहे. मात्र, या मार्गावरील रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच बीआरटी मार्गातील अनेक कामे अपूर्ण आहेत. ही कामे तत्काळ करणे गरजेचे असल्याने महापालिकेच्या पथ विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद आहे. पथ विभागाने ९९ लाख ८३ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. या कामांमध्ये खोदकाम, सपाटीकरण, काँक्रिटीकरण, ड्रेनेज चेंबरची झाकणे समपातळीवर आणणे, बोलार्डस बसविणे, इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे यासह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. त्यासाठी सर्वात कमी दराने म्हणजे पूर्वगणनेपेक्षा २२ टक्के कमी म्हणजेच, ६५ लाख रुपयांची निविदा सादर झाली. त्यावर जीएसटी व अन्य शुल्क अशा एकूण ८१ लाख २७ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. सातारा रस्ता मुख्यतः काँक्रिटचा आहे. बीआरटी मार्गिका अंशतः डांबरी आणि काँक्रिट अशा मिश्र स्वरुपाची आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. बीआरटी सेवा सुरू करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. त्यानंतर देशातील अनेक प्रमुख शहरात बीआरटी सेवेचा झपाट्याने विस्तार होत असताना आणि देशभरात एक हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे निर्माण झाले असताना शहरातील बीआरटीचा मात्र बट्ट्याबोळ झाला आहे. महापालिकेच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात बीआरटी मार्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी नव्याने बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र, गेल्या पाच वर्षांत एकही किलोमीटरने बीआरटी सेवेचा विस्तार झाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 10:36 IST

संबंधित बातम्या