पुणे : आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाइपद्वारे नैसर्गिक वायूपुरवठा (पाइप्ड् नॅचरल गॅस- पीएनजी) जोडण्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिदिन ४५० नव्या जोडण्या दिल्या जात आहेत. गॅस सिलिंडरवरील (एलपीजी) अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ने (एमएनजीएल) पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘एमएनजीएल’ने नियोजन सुरू केले असून गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष सवलत योजनाही जाहीर केली आहे.
आखाती देशांमधील युद्धामुळे शहरातील गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘पीएनजी’ला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला गती देण्यासाठी नवीन आदेश जारी केला आहे. गॅस वाहिनी टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विनाअडथळा खोदकाम करता येणे शक्य होणार आहे. तसेच, येत्या तीन महिन्यांनंतर एलपीजी बंद होण्याची शक्यता असून, ‘पीएनजी’साठी नागरिकांनी तातडीने जोडणी घ्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘पीएनजी’चा आढावा ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने घेतला असता ‘पीएनजी’च्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
‘पीएनजी’चे उत्पादन देशांतर्गत होत असून, त्याचा मोठा साठाही उपलब्ध आहे. गॅस टंचाईपूर्वी प्रतिदिन १८० जोडण्यांसाठी अर्ज ‘एमएनजीएल’कडे येत होते. मात्र, आता ४५० अर्ज प्रतिदिन येत असून, तेवढ्या जोडण्या ‘एमएनजीएल’कडून देण्यात येत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज आल्यानंतर पूर्ण क्षमतेने आणि शंभर टक्के वितरण करण्यात येत आहे. दरम्यान, सोसायटीत पीएनजीची वाहिनी असल्यास आणि सदनिकाधारकाने जोडणी घेतल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांची विशेष सवलतही देण्यात येत आहे. नव्याने अर्ज आल्यास तातडीने जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या, सर्वाधिक सोसायट्या असलेला भाग, बैठी घरे अशांनाही पीएनजी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, तांत्रिकदृष्ट्या शक्य असलेल्या सर्वच भागात जास्तीत जास्त जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात आठ लाखांपेक्षा जास्त घरगुती पीएनजी ग्राहक असून, त्यापैकी साडेचार लाख ग्राहकांकडून प्रत्यक्ष पीएनजीचा वापर होत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड, चाकण, हिंजवडी आणि तळेगाव येथे पीएनजीचा पुरवठा केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
‘पाइप्ड् नॅचरल गॅस’साठी नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांना पहिल्या देयकामध्ये ५०० रुपयांची विशेष सवलत देण्यात येत आहे. तसेच, अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून, ग्राहकांची एकूण १ हजार ५५० रुपयांची बचत होणार आहे. नवीन ग्राहकांना पहिले दोन महिने अवघे सहाशेच रुपये बिल येईल. ‘एमएनजीएल’चे संकेतस्थळ आणि ‘माय एमएनजीए’ ॲप ग्राहकांना ‘पीएनजी’ जोडणीसाठी नोंदणी करता येणार आहे.
