पुणे : शहरातील ‘पाइप्ड् नॅचरल गॅस’ची (पीएनजी) जोडणी पोहोचलेल्या सहा हजार गृहनिर्माण सोसायट्यांमधील केवळ वीस टक्के सदनिकांमध्येच ‘पीएनजी’चा वापर होत असल्याने सहकार विभागाने ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या (एमएनजीएल) पुढाकारातून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे उर्वरित ८० टक्के सदनिकांमध्ये ‘एलपीजी’ ऐवजी ‘पीएनजी’चा वापर करण्यास सदनिकाधारकांना प्रोत्साहित केले जाणार असून, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जाणार आहेत.

राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या सभागृहात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर त्याबाबतची माहिती तावरे यांनी पत्रकारांना दिली. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक श्री कुमार शंकर, संचालक (वाणिज्य) मेजर शंकर करजगी, संचालक बागेश्री मंठाळकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते.

आखाती देशांमधील युद्धामुळे शहरातील गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून, सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार विभाग आणि ‘एमएनजीएल’ने पुढाकार घेऊन सहा हजार सोसायट्यांमधील शंभर टक्के सदनिकांमध्ये ‘पीएनजी’चा वापर करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. नागरिकांनी ‘एलपीजी’ला स्वस्त, सुरक्षित आणि मुबलक पर्याय असलेल्या ‘पीएनजी’चा अवलंब करावा, असे आवाहन तावरे यांनी बैठकीत केले.

शहरात ‘एमएनजीएल’चे जाळे विस्तारले असून, उपनिबंधकांनी त्यांच्या हद्दीतील ‘एमएनजीएल’ची जोडणी पोहोचलेल्या सर्व सोसायट्यांना पत्र पाठवून शंभर टक्के घरांमध्ये ‘पीएनजी’चा वापर करण्याचे आवाहन करावे, तसेच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आणि अपार्टमेंट महासंघानेही जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

‘पहिल्या टप्प्यात शहरात ‘एमएनजीएल’ची जोडणी असलेल्या सोसायट्यांमध्ये दोन लाख घरांमध्ये ‘पीएनजी’चा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे घरटी दोन या प्रमाणे एकूण ४ लाख एलपीजी सिलिंडरची बचत होऊन ते वाणिज्यिक-औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होतील,’ असे बागेश्री मंठाळकर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ‘पाइप्ड् नॅचरल गॅस’साठी नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांना पहिल्या देयकामध्ये ५०० रुपयांची विशेष सवलत देण्यात येत आहे. तसेच, अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून, ग्राहकांची एकूण १ हजार ५५० रुपयांची बचत होणार आहे. नवीन ग्राहकांना पहिले दोन महिने अवघे सहाशेच रुपये बिल येईल. ‘एमएनजीएल’चे संकेतस्थळ आणि ‘माय एमएनजीए’ ॲप ग्राहकांना ‘पीएनजी’ जोडणीसाठी नोंदणी करता येईल, असे श्री कुमार शंकर आणि मेजर शंकर करजगी यांनी स्पष्ट केले.