“मी दोन दिवसापासून नॉट रिचेबल होतो, अशी चर्चा सोशल मीडियावर पाहण्यास मिळाली. परंतु मी जरी फिल्डवर नव्हतो, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याप्रमाणे पडद्यामागे राहून काम करत होतो. पुण्यातील आंदोलनाची जबाबदारी राज्य चिटणीस अजय शिंदे यांच्याकडे होती. तर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी किशोर शिंदे यांच्याकडे होती,” अशी माहिती मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी मांडली.

यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास त्या समोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्या आदेशानुसार मनसेचे कार्यकर्ते कालपासून आक्रमक झाले. पण यामध्ये पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत, त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या सर्व चर्चांनंतर अखेर साईनाथ बाबर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली.

‘नॉट रिचेबल’ असलेल्या वसंत मोरेंनी केली फेसबूक पोस्ट; म्हणाले, “मी माझ्या भागातील…”

यावेळी साईनाथ बाबर म्हणाले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मशिदीवरील भोंग्याबाबत कालपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. त्या अगोदरच आमच्यावर पोलिसांचा प्रचंड दबाव होता. आमच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारिक लक्ष होते. त्यामुळे मी माझा एक फोन नंबर स्वीच ऑफ करून ठेवला होता आणि दुसरा नंबर शहरातील प्रमुख पदाधिकारी यांना दिला होता. त्यावर मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्वांच्या संपर्कात होतो. बुधवारी शहरात जवळपास १२५ हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते,” असं बाबर यांनी सांगितलं.

“मी कोंढवा भागात मागील १० वर्षांपासूनन नगरसेवक म्हणून काम करीत आहे. त्या काळात मी अनेक चांगली विकासकामे केली आहेत, त्यामुळे मी निश्चित आगामी निवडणुकीत विजयी होईल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्या भागातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुस्लिम नागरिकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मात्र आम्ही प्रत्येक मुस्लिम नागरिकांचा संभ्रम निश्चित दूर करणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करणार आहे,” असं ते म्हणाले.

वसंत मोरे येत्या काळात दिसतील – साईनाथ बाबर

“वसंत मोरे हे आमचे नेते आहेत. मी नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. पण मध्यंतरी दोन आंदोलनं झालीत, त्यामध्ये ते दिसले नाहीत. त्यावेळी ते वैयक्तिक कामामुळे येऊ शकले नव्हते. माझी दोन दिवसापूर्वी वसंत मोरे यांच्यासोबत चर्चा झाली होती. वसंत मोरे हे राज ठाकरे यांना मानणारे असून भविष्यात मनसेच्या आंदोलनांमध्ये दिसतील,” असं बाबर म्हणाले.