शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.अजय चंद्रकांत विटकर (वय २०), विजय चंद्रकांत विटकर (वय १८), दत्ता रवींद्र धोत्रे (वय २२), सागर मनोहर धोत्रे (वय २७), सिद्धार्थ शंकर गायकवाड (वय २३, सर्व रा. वडारवाडी, शिवाजीनगर), कृष्णा उर्फ किच्ची राजेश माने (वय २५, रा. वैदुवाडी, सेनापती बापट रस्ता), अतुल धोत्रे (वय २२), विजय उर्फ चपाती विटकर (वय २३) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा >>> टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्‍हे भागातील घटना

वडारवाडी भागात अजय विटकर आणि साथीदारांनी गंभीर गुन्हे केले होते. दहशत माजविणे, लूटमार, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे विटकर टोळीच्या विरोधात दाखल आहेत. त्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी तयार केला.अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी दिली. गेल्या दीड वर्षात शहरातील ९८ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.