पुणे : शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली असल्याने धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी सदाशिव पेठेतील अभिनव चौकाजवळ एक झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.

अभिनव चौकात झालेल्या दुर्घटनेमध्ये स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे या तरुणीला तातडीने झाडाखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या अनर्थाची किंवा जीवितहानीची वाट न पाहता, युद्धपातळीवर शहरातील सर्व धोकादायक झाडे आणि फांद्यांचे फेरसर्वेक्षण करून त्यांची तातडीने छाटणी करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदू कदम यांनी दिला आहे.

कदम म्हणाले, पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक धोकादायक झाडे तसेच फांद्या अचानकपणे रस्त्यावर पडतात. पावसाला सुरुवात झाल्यानंतर धोकादायक झालेली झाडे तोडण्यासाठी पुणेकरांना अडचणींना सामोरे जावे लागते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत शहरात कुठेही मोठे झाड किंवा फांडी कोसळली, तर फार मोठी जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील तसेच समाविष्ट गावातील झाडांचे तात्काळ फेरसर्वेक्षण करावे. सर्वेक्षणानंतर ज्या ज्या ठिकाणी झाडे अथवा फांद्या पडण्याच्या स्थितीत आहेत, त्यांची युद्धपातळीवर छाटणी करण्याचे काम हाती घ्यावे. पुढील आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराजांनी पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यांनाही या धोकादायक झाडांचा आणि फांद्यांचा त्रास होऊ नये, महापालिका प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी चंदू कदम यांनी उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याकडे केली आहे.

वारकरी अन् पुणेकरांच्या जीवाला धोका

पुढील आठवड्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल होत आहे. या भक्तिमय सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुणे शहरातील विविध रस्त्यांवर चालणार आहेत. आधीच पावसाळा सुरू असल्याने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहरातीलअनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत.

काँग्रेसचे गटनेते चंदू कदम म्हणाले, पुणे शहरातील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करणे ही महापालिका प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आणि प्राथमिकता असली पाहिजे. कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तातडीने पावले उचलत भूमिका घेणे आवश्यक आहे.