पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन पुणे महापालिकेच्या प्रशासनाने दिले होते. मात्र यंदादेखील पुणेकरांना पावसाळ्यात नाले तुंबून वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर घाण पाण्याचा सामना करावा लागेल अशी दाट शक्यता आहे.
पुढील काही दिवसांमध्ये पावासाला सुरुवात होणार असताना पुणे महापालिकेची नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. महापालिकेच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा वेग अत्यंत संथ असून, शहरातील केवळ ६० ते ६५ टक्के नाल्यांची सफाई आतापर्यंत पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पहिल्याच मुसळधार पावसात शहरातील रस्ते, चौक आणि निवासी भाग जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत शहरातील सर्व नाले, पावसाळी वाहिन्या आणि जलनिस्सारण व्यवस्था शंभर टक्के स्वच्छ असणे आवश्यक आहे. महापालिकेचा तसा नियम आहे. प्रत्यक्षात आजही अनेक प्रभागांमध्ये नालेसफाईची कामे अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने ४० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर कामांचा वेग वाढविण्यात आला असला, तरी सद्य:स्थितीत केवळ ६३ टक्क्यांच्या आसपासच प्रगती झाली आहे.
विशेष म्हणजे, शहरातील तब्बल ६५ पूरग्रस्त आणि पाणी साचणाऱ्या संवेदनशील ठिकाणांची यंदा पुन्हा यादी तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसात शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. नाले, तसेच सांडपाणी वाहिन्या तुंबल्याने नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरले होते. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा झोपेतून जागी झाली होती.
सिंहगड रस्ता, कात्रज, बाणेर, खराडी, हडपसर, कोंढवा, शिवाजीनगरसह अनेक भागांतील नाले तुंबल्याने रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. वाहतूक विस्कळीत झाली होती आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. यंदादेखील त्याच ठिकाणी अनेक कामे अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
महापालिकेने यंदा नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता आणि पूरनियंत्रणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वतंत्र ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मे महिन्याच्या अखेरीस कामे अपूर्ण राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांतून काढलेला गाळ रस्त्यालगत पडून असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
दर वर्षी पावसापूर्वी नालेसफाईचे दावे आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याची पुनरावृत्ती हा पुणेकरांच्या नशिबी आलेला वार्षिक कार्यक्रम बनला आहे. यंदाही परिस्थिती फारशी बदललेली दिसत नाही. पावसाचा पहिला जोरदार मारा झाल्यानंतरच प्रशासनाच्या दाव्यांची खरी परीक्षा होणार असून, रखडलेल्या नालेसफाईचा फटका पुन्हा पुणेकरांनाच बसतो का, हे आता सरी कोसळल्यावरच कळेल.
