पुणे : ‘एल निनो’चे सावट असतानाही यंदा पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या मोसमात पुण्यात शिवाजीनगर येथे ७३६.२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यातील ५३ टक्के पाऊस जुलैच्या केवळ एका आठवड्यात नोंदवला गेला.

यंदाच्या पावसाच्या संपूर्ण हंगामावर ‘एल निनो’चा प्रभाव राहणार असल्याने, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती. दर वर्षी १० जूनच्या सुमारास पुण्यात दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांनाही यंदा विलंब झाला. त्यामुळे जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला.ही तूट जुलैमधील पावसामुळे भरून निघाली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात लाठोपाठ निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे शहर आणि घाट परिसरात जोरदार पाऊस बरसला. घाट परिसरातील काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली. लोणावळा, ताम्हिणी अशा काही ठिकाणी एका दिवसात ५०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरली.

ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले. ते थेट २८ सप्टेंबरला झालेल्या पावसापर्यंत कायम राहिले. त्या दिवशी पन्नासहून अधिक दिवसांनंतर शिवाजीनगर येथे दोन आकडी पाऊस नोंदवला गेला.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शहरात जूनमध्ये ६४, जुलैमध्ये ५२३.६, ऑगस्टमध्ये ८४.५, तर सप्टेंबरमध्ये ६४.१ मिलिमीटर असा एकूण ७३६.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. शहरात जून ते सप्टेंबर कालावधीत साधारणपणे सरासरी ६४० मिलीमीटर पाऊस पडतो.

वर्षनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

२०२२ : ८१८
२०२३ : ४४६

२०२४ : ११३३
२०२५ : ८४१

२०२६ : ७३६

जिल्ह्यात १३ टक्के जास्त पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ९४९.२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा १३ टक्के जास्त, म्हणजे १०७४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.