पुणे : मुलांवरून होणाऱ्या वादातून दोन मुलांचा गळा आवळून खून करणाऱ्या आईला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. बी. भन्साळी यांनी यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पूना संजय सोळंकी (वय २८, रा. मेरिखेडा, ता. हरसोड, जि. खांडवा, मध्य प्रदेश) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी तिने स्वत:ची तीन वर्षांची मुलगा चंदा आणि दोन वर्षांचा मुलगा आनंद यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता. याबाबत तिचे पती संजय सोळंकी यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून वकील विजय फरगडे आणि ॲड. अनिलकुमार वर्मा यांनी काम पाहिले. पौड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ अणि पथकाने खून प्रकरणाचा तपास केला. साक्ष नोंदविण्यापूर्वी धुमाळ यांचे निधन झाल्याने पौड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संजय शेंडगे यांनी न्यायालयात साक्ष दिली.

साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालायने आरोपी महिलेला दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी पाच महिने साधी कैद भोगावी लागणार आहे. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षांची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.