पुणे : गृहनिर्माण क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असताना रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी त्यांच्यासाठी नवीन नियमावली लागू केली. या नवीन नियमावलीचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर मंडळाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मंडळाकडून पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत २१ ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्यात आले आहेत. यापुढील काळातही ही धडक कारवाई सुरु राहणार आहे.

‘आरएमसी’ प्रकल्पांमुळे होत असलेल्या हवा प्रदूषणाचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरून ‘आरएमसी’ प्रकल्पांविरोधात आंदोलन केल्याने त्याची तीव्रता समोर आली. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘आरएमसी’ प्रकल्पांसाठी नवीन नियमावली गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लागू केली. मात्र, या नियमावलीच्या अंमलबजावणीत ‘आरएमसी’ प्रकल्पांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य मिळत नव्हते. त्याच्यामुळे ही अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. अखेर हा तिढा सुटल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘आरएमसी’ प्रकल्पांना नवीन निमयावलीचे पालन करण्याच्या सूचना केल्या.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘आरएमसी’ प्रकल्पांकडून नवीन नियमावलीचे पालन होते की नाही, हे तपासण्याची मोहीम जानेवारी महिन्यापासून सुरू केली. मंडळाने पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात ही मोहीम राबविली. यात एकूण २१ ‘आरएमसी’ प्रकल्पांकडून नियमभंग झाल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकल्पांना नियमांचे पालन करण्यास मुदत देऊनही त्यांनी हे करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मंडळाने अखेर हे ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्याचे पाऊल उचलले.

बंद करूनही प्रकल्प सुरूच

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्याची कारवाई करूनही ते सुरूच राहत असल्याचे प्रकार घडत आहेत. काही प्रकल्पांचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्यानंतर ते जनित्रावर सुरू ठेवले जातात. याच वेळी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेल्या प्रकल्पांकडून टँकरचे पाणी वापरण्याची पळवाट शोधली जाते. त्यामुळे असे बेकायदा सुरू असलेले प्रकल्प शोधून ते लाखबंद करण्याचे पाऊल मंडळाने महसूल विभाग, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या मदतीने उचलले जाते, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले.

कठोर कारवाई करणार

‘आरएमसी’ प्रकल्पांमुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मंडळाकडे येत आहेत. या प्रकल्पांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन करणारे २१ आरएमसी प्रकल्प बंद करण्याची कारवाई करण्यात आली. मंडळाकडून ‘आरएमसी’ प्रकल्पांची तपासणी सातत्याने सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी दिली.