महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटीच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमल्यानंतर पुण्यातील एमपीएससी परीक्षार्थ्यांचे ११ दिवस चाललेले आंदोलन थांबले. उमेदवारांच्या मागणीनुसार, या आयोगाच्या सचिवपदी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, आयोगाची चौकशी होईपर्यंत ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर जातील, असाही निर्णय झाला. गेल्या रविवारी (११ ऑक्टोबर) रात्री उशिरा आंदोलन मागे घेतले गेल्यानंतर आता या आंदोलनाच्या यशस्वितेबाबत चर्चा होत आहेत, त्याही प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या पातळीवर. या आंदोलनादरम्यान विरोधकांची एकजूट दिसली खरी. पण, नंतर श्रेयाच्या मुद्द्यावरून जाहीर नाही, तरी अंतर्गत चलबिचल सुरू आहे.

आंदोलनाचे फलित काय?

‘एमपीएससी’च्या परीक्षा आणि गोंधळ हे समीकरण गेली दीड-दोन दशके कायम आहे. कधी परीक्षांचे कोलमडणारे वेळापत्रक, कधी आयत्या वेळी तारखांत बदल, कधी निकालाला उशीर, कधी निकालानंतर नियुक्त्यांना उशीर, तर अलीकडे पेपरफुटीचे आरोप यांमुळेच या परीक्षा सातत्याने चर्चेत असतात. त्या चर्चेचे आणि त्यातून उडणाऱ्या धुरळ्याचे प्रमुख केंद्र असते पुणे. ते का, ते आधी समजून घ्यायला हवे.

चांगल्या सरकारी नोकरीची आस आणि नागरी सेवांतील मानाच्या पदांची आकांक्षा यांमुळे अनेक पदवीधरांना करिअरसाठी हा मार्ग खुणावतो. अगदी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतरही नागरी सेवा परीक्षांकडे वळणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली. प्रशासकीय सेवांत मराठी माणसाचा टक्का वाढायला हवा आणि त्यासाठी अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षा गांभीर्याने देऊन त्याकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहायला हवे, ही जागरूकता निर्माण झाल्याचा परिपाक म्हणजे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या. पण, ही तयारी स्वबळावर करू शकतील, असे फार कमी, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाची सोय असणे गरजेचे बनले. अशा मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेल्या अधिकृत वर्गांच्या कमतरतेत खासगी शिकवणी वर्गांनी एक मोठी संधी शोधली आणि गेल्या दीड-दोन दशकांत एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या खासगी मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले.

मार्गदर्शन वर्गांचा हा बहर पुण्यात आला, त्याला थेट कारण म्हणजे पुण्याची शैक्षणिक ओळख. इथे मार्गदर्शनासाठी सहज उपलब्ध होऊ शकणारे मनुष्यबळ हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा. जोडीने वसतिगृह, अभ्यासिका ते खाणावळींपर्यंतची एकत्रित परिसंस्था पुण्यात पटकन उभी राहिली. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा येथील विद्यार्थ्यांना पुणे सोयीचे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईपेक्षा त्या मानाने स्वस्त आणि प्रवासाची अंतरे कमी. मुंबईपेक्षा पुण्याचा तोंडवळा अजून मराठी आहे, हेही एक कारण. साहजिकच गेल्या काही वर्षांत नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग पुण्यात तयार झाला. जोडीने विद्यार्थी खेचण्यासाठी मार्गदर्शन वर्गांतील स्पर्धा वाढली. त्यासाठी ‘आमचे इतके यशस्वी’ अशा जाहिराती सुरू झाल्या. गावाखेड्यांतून सरकारी अधिकारी बनण्यासाठी पुण्यात येणारे परीक्षार्थी वाढले. त्यांच्या या स्वप्नांसाठी पोटाला अक्षरश: चिमटा काढून गावाकडचे पालक पाल्यासाठी पैसा पाठवू लागले. मात्र, या स्वप्नाच्या यशस्वितेचे वास्तव प्रमाण आणि त्यामुळे त्यामागे धावताना हाती आवश्यक असलेले रोजगाराचे अन्य दोन-तीन पर्याय याबद्दल फार थोड्या वर्गांनी मार्गदर्शन केले. वर्षानुवर्षे एकाच स्वप्नामागे धावताना होणारी दमछाक आणि त्यात ‘एमपीएससी’च्या गचाळ नियोजनामुळे होणारे विलंब यांत या उमेदवारांची फरपट होते आहे, हे वास्तव. त्याचे पडसाद आधी छोट्या-मोठ्या आंदोलनात उमटत होतेच. या वेळच्या आंदोलनात ते अधिक तीव्र झाले. त्या अर्थाने ‘एमपीएससी’च्या कारभाराचे मुळातूनच शुद्धीकरण होणे गरजेचे होते, ज्याची सुरुवात का होईना, या आंदोलनाच्या निमित्ताने झाली. राज्य सरकारने नेमलेली व्ही. राधा समिती आणि आता पेपरफुटींसाठी नेमलेला चौकशी आयोग यांच्या शिफारशींच्या कठोर अंमलबजावणीवर त्याचे परिणाम अवलंबून आहेत. परीक्षा, निकाल आणि नियुक्त्या यांचे वेळेचे गणित योग्य पद्धतीने बसले, तर नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यशसाठी नेमकी किती वाट पाहायची आणि पर्याय शोधायला कधी सुरुवात करायची, याचे योग्य भान येण्यास मदत होईल. उपलब्ध जागा शेकड्यांत आणि परीक्षेला बसणारे हजारो हे प्रमाण एकदा समजले, की परीक्षेतील यशाचा टक्का किती असेल, याचे भान येते. तोही उमेदवारांना नीट समजावून द्यायला हवा. हे काम मार्गदर्शन वर्गांनी चोख करणे आवश्यक आहे. हे भान या आंदोलनात उतरलेल्या राजकीय नेत्यांनीही परीक्षार्थ्यांना द्यायला हवे.

राजकीय साद-पडसाद

रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि ते बराच काळ चालविणे सोपे नाही. पुण्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीला एका वेळी तीन आंदोलने सुरू झाली. त्यातील परीक्षांच्या स्वरूपाबद्दलच्या दोन आंदोलनांपेक्षाही ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी एस. एम. जोशी पुलाजवळ झालेल्या आंदोलनाची चर्चा जास्त झाली. त्या आंदोलनाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गणेश विसर्जनापूर्वीच केली होती. त्यासाठी जागेच्या परवानगीपासूनच संघर्ष सुरू झाला. पुढे हा जागेचा प्रश्न न्यायालयातही गेला. नंतर पोलिसांनी विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल सुरुवात करण्यापर्यंत तो पोचला. या दरम्यानच्या काळात रोज सायंकाळी विरोधी पक्षातील मातबर नेते आंदोलनाला भेट देत राहिले. विशेष म्हणजे रोहित पवारांचे नेतृत्व असूनही ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांचा ठळकपणे अधिक सहभाग होता.

‘एमपीएससी’च्या परीक्षार्थ्यांचा मुद्दा रास्त असला आणि त्यासाठी रोहित पवार यांनी कष्टही बरेच घेतले, तरी पुणे शहरातील जेन-झी त्यांच्या बाजूला आली, असे झाले नाही, हेही वास्तव. ‘एमपीएससी’चे बहुतांश परीक्षार्थी हे पुण्याबाहेरून पुण्यात शिकायला आले आहेत. त्यांचा सहभाग असला, तरी त्यांच्यासाठी पुणेकर विद्यार्थी वा जेन-झीने मोठा प्रतिसाद दिला, असे झाले नाही. पुण्यातील ‘नीट’ पेपरफुटीविरोधातील आंदोलनात तो दिसला होता. ते आंदोलन बहुतांश अराजकीय असल्याने तसे झाले होते का, हीसुद्धा यानिमित्ताने विचार करायची गोष्ट. शिवाय, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केल्यानंतर आंदोलनात पसरलेल्या अस्वस्थतेचीही योग्य दखल घ्यायला हवी.

राजकीय पातळीवर, ‘राष्ट्रवादी’तील अनेक वरिष्ठ नेते रोहित पवार यांच्यापासून जरा हात राखून दूर थांबल्याचे दिसले. त्यामुळेच, ‘राहुल गांधी पुण्यात आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार,’ ही घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी न करता रोहित पवारांनी केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले. रोहित पवार आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघाकडून लढणार, त्यासाठी प्रसंगी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशा वावड्या उठल्या, त्या यामुळेच.

महाविकास आघाडी म्हणून विचार करायचा, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदी आंदोलनस्थळी येऊन गेले, अगदी राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. पण, सातत्याने उपस्थिती होती आमदार विश्वजित कदम यांची. पुणे शहरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची रसदही आंदोलनाला होती. या ‘उपस्थिती’चा विश्वजित कदम यांना पुढील काळात राजकीय फायदा किती मिळतो, हे पाहणेही रोचक ठरेल. गेले सहा-सात महिने ते पुण्यात विविध कार्यक्रम, बैठका यांत सक्रिय झाल्याचे दिसते. आंदोलनातही विद्यार्थ्यांना मदत करण्यात ते पुढे होते. मात्र, या आंदोलनाचे जितके श्रेय रोहित पवार यांच्या पदरी पडले, तितके कदम यांना किंवा एकूणच काँग्रेसला मिळाले नाही. पुणे शहर काँग्रेसच्या वर्तुळात याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याला पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला देण्याच्या निर्णयाबद्दलच्या नाराजाचीही जोड आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन ‘तहात हरले’ असे वक्तव्य करून आंदोलनाच्या फलितावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आघाडीतील या अस्वस्थतेची दखल तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते कसे घेतात, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष असेल. या आंदोलनाच्या निमित्ताने इतके सगळे घडले आहे. त्यातील मुख्य मुद्दा ‘एमपीएससी’तील आमूलाग्र बदलांचा. त्या प्रश्नाची तड लागायला हवी. राजकीय सुंदोपसुंदीत हा प्रश्न मागे पडून चालणार नाही.

siddharth.kelkar@expressindia.com