पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने शहरात होत असलेल्या आंदोलनावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘विद्यार्थ्यांआडून आमदार रोहित पवार राजकारण करीत आहेत,’ अशी टिप्पणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलकांच्या मागणीकडे लक्ष देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून, चर्चेतून मार्ग काढावा,’ असे आवाहन केले. खासदार संजय राऊत यांनी रोहित पवारांच्या ठिकाणी, तर आमदार नीतेश राणे यांनी दुसऱ्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावली.

पेपरफुटीवरून ‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करून स्पर्धा-परीक्षार्थ्यांनी रविवारी, सलग चौथ्या दिवशी ठिय्या आंदोलन केले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला सायंकाळी शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, विजय वडेड्डीवार यांनी भेट दिली. तसेच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदित्य ठाकरेंना रविवारी आंदोलनात सहभाही होता आले नाही. मात्र, तेही लवकरच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला भेट देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. ‘सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पण, हे महाराष्ट्रातले ‘जंतर-मंतर’ आहे,’ असे राऊत म्हणाले.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम आदी नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण देण्यात येत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांआडून रोहित पवार राजकारण करत असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले. अहिल्या अभ्यासिकेसमोर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या आंदोलनाला भेट देऊन राणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अहिल्या अभ्यासिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली.