पुणे : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीवरून शहरात तीन वेगवेगळ्या भागांत आंदोलने सुरू आहेत. ही आंदोलने बेकायदा असून, आंदोलकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे’, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.

‘संबंधित आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पोलिसांनी २९ शिकवणी चालक, अभ्यासिका चालक आणि ५१ विद्यार्थ्यांना नोटीस बजावली आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

‘स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एस. एम. जोशी पूल, लोकमान्य टिळक चौक, शास्त्री रस्त्यावर आंदाेलन करण्यात येत आहे. पोलिसांनी संबंधित आंदोलनांना परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्यात येत आहे. आयोजकांना आंदोलन न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. आंदोलनास विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी भेट दिली आहे. आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आंदोलनाच्या परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. संबधित आंदाेलनांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणारे खासगी शिकवणी चालक, अभ्यासिका चालकांसह विद्यार्थ्यांनी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत सांगण्यात आले होते. आंदोलन ठिकाणचे चित्रीकरण, अन्य माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. या माहिती पडताळणी केल्यानंतर संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलन करण्याचा आधिकार असला, तरी संबंधितांनी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी नाकारल्यानंतर आंदाेलन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त

ड्रोनद्वारे चित्रीकरण; कारवाईचा इशारा

नवी पेठेतील एस. एम. जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे दिसून आले. पोलीस परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणात संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या ड्रोनचा वापर कोणी केला, याचीही चौकशी केली जाणार आहे.