शहराचा विस्तार होत असताना प्रायोगिक नाटकांसाठी पुरेशी सांस्कृतिक केंद्रे नव्हती, हे वास्तव होते. ही उणीव वडगाव धायरी परिसरात नव्याने सुरू झालेल्या ‘मुक्त थेटर’ने पूर्ण केली आहे. शहराच्या एका महत्त्वाच्या उपनगरामधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी हा रंगमंच सज्ज झाला आहे. त्याला गरज आहे, ती रसिकांच्या पाठबळाची.
प्रयोगशील नाट्याविष्काराने पुण्यात पूर्वीच खंबीरपणे पाय रोवले असले, तरी प्रायोगिक नाटकांच्या सादरीकरणासाठी फारसा अवकाश नव्हता. आप्पा बळवंत चौकातील लक्ष्मी क्रीडा मंदिर, सहकारनगर परिसरातील मुक्तांगण केंद्र अशा मोजक्या ठिकाणी प्रायोगिक नाटके सादर होत होती. मात्र, शनिवार पेठेमध्ये महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सु-दर्शन रंगमंचाच्या माध्यमातून प्रायोगिक नाटकांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. नंतरच्या काळात ज्योत्स्ना भोळे सभागृह, प्रदीप वैद्य यांचे ‘द बॉक्स संकुल’, डॉ. श्रीराम लागू रंग-अवकाश आदी मंचांनी प्रायोगिक रंगभूमीची वाट प्रशस्त केली. ‘मुक्त थेटर’च्या माध्यमातून राहुल लामखडे या तरुणाने ती विस्तारली आहे.
एका तपापूर्वी जुन्नरहून पुण्याला आल्यानंतर एका ‘एटीएम’मध्ये रात्रीचा रखवालदार म्हणून राहुलने उमेदवारी केली आहे. त्या वेळी संगीत संयोजक संजय देशपांडे यांनी त्याची ओळख नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्याशी करून दिली. ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या नाटकाच्या प्रयोगाच्या संगीत संयोजनाची जबाबदारी राहुलने स्वीकारली. पुढे तो ‘किमया’ आणि ‘समाजस्वास्थ्य’ या प्रयोगांनाही संगीताची बाजू सांभाळू लागला. एकेक तंत्र शिकून राहुलने साउंड मिक्सर, माइक आणि दिवे विकत घेतले.
प्रदीप वैद्य यांचेही मार्गदर्शन त्याला मिळाले. त्याने अनेक लोकांना जोडून घेतले, स्वतः नाटक बसविले, वाचन प्रयोग केले. पुढे राज्य नाट्य स्पर्धांकरिता तो समन्वयक म्हणून काम करू लागला. इतकेच नाही, तर ‘घुम्या’ हा लघुपटही त्याने केला. भावासमवेत राहुलने प्रकाशयोजना आणि ध्वनियंत्रणा उभी केली. अचानक एक संकट आले. पुरामुळे सर्व साहित्य खराब झाले. तरीही तो खचला नाही. सर्व साहित्य सुरक्षित ठेवायला गाळे शोधले. नाटक हा कला व्यवहार आहे, हे उमगल्यानंतर आर्थिक व्यवहार चोख ठेवून राहुलने विश्वास संपादन केला.
गावाकडे शेतीवाडीत कष्ट करणाऱ्या आई-वडिलांना घर बांधून दिले. नुकतेच त्याने धायरी गावामध्ये ‘मुक्त थेटर’ हे समीप नाट्यगृह साकारले आहे. राहुल जोशी या गायक-नटाच्या कारखान्याच्या शेडमध्ये ८० ते ९० लोक बसतील, असे हे नाट्यगृह आहे. शहर वाढलेले असताना असे नाट्य अवकाश अनेक जागी उभे राहणे ही सर्वांची गरज आहे. ती कसर राहुलने भरून काढली. सिंहगड रस्ता, धायरी परिसर, डीएसके विश्व येथील प्रेक्षकांना कलाविषयक नव्या विविध उपक्रमांचा आनंद देऊ शकणारी ही जागा आता सोयीची आणि उपयुक्त ठरेल.
रसिकांच्या पाठबळावर तीन दिवसांच्या कलाविष्काराने नुकतेच ‘मुक्त थेटर’चे उद्घाटन झाले. ‘नाटक करण्यासाठी पुण्यात आलो. ‘सु-दर्शन रंगमंचा’ने माझ्यासारख्या नवख्या प्रयोगशील कलाकारांना प्रयोग करता येईल, अशा सोयी दिल्याने प्रयोग करून पाहता आले. पण, दिवसेंदिवस रंगभूमीकडे वळणाऱ्या तरुण कलाकारांची संख्या पाहता पुण्यात नाटकाच्या तालमी आणि प्रयोगांसाठी जागा कमी पडू लागली. नवीन कलाकार वाढताहेत, नाट्य चळवळ वाढते आहे, शहर अवाढव्य वाढताना दिसते आहे. सांस्कृतिक केंद्रे मात्र वाढत नाहीत. ती फक्त शहराच्या मध्य भागीच असल्याने नाटक पाहणे सामान्य नागरिकांसाठी कठीण आहे,’ असे निरीक्षण राहुलने नोंदवले.
तो म्हणाला, ‘आधीच मनोरंजनाला फार प्राधान्य नाही. सिंहगड रस्ता, धायरी हा पुण्याचा झपाट्याने वाढणारा मोठा भाग फक्त वाहतूक कोंडी, पाणीसमस्या, पूर, अतिक्रमण यानेच गाजलेला दिसतो. परंतु या ‘मुक्त थेटर’ आणि कला उत्सवाला आलेल्या प्रेक्षकांनी धायरी भागात ही जागा तयार झाल्याने फार समाधान व्यक्त केले आणि पाठिंबादेखील दिला. अनेक कलाकार मंडळी आणखी एक जागा तयार झाल्याने पाठीशी आहेत. या जागेचा वापर नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी केला जाईल.’
vidyadhar.kulkarni@expressindia.com

