पुणे : शहरातील मुळा-मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि वैद्यकीय टाकाऊ पदार्थ मिसळल्यामुळे नदीतील प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. नदीच्या पाण्यात मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणारे जड धातू आणि बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू (मल्टिड्रग रेझिस्टन्ट बॅक्टेरिया) मोठ्या प्रमाणात आढळले असून, म्हात्रे पूल आणि संगम पूल या ठिकाणी प्रदूषणाची तीव्रता सर्वाधिक नोंदवली गेली.
गणेशखिंड येथील मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील संशोधक डॉ. विनय कुमार यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने या बाबतचे संशोधन केले. संशोधन पथकात कवलजित कौर, प्रमोद बारठे, सागर रेड्डी यांचा समावेश होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘टॉक्सिकोलॉजी अँड एन्व्हॉर्न्मेंटल हेल्थ सायन्स’ या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संशोधनासाठी केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभागाच्या बिल्डर प्रकल्पाअंतर्गत निधी प्राप्त झाला होता.
संशोधनासाठी नदीतून गोळा केलेल्या जिवाणूंच्या नमुन्यांमध्ये क्लेब्सिएला न्यूमोनिया आणि एंटेरोबॅक्टेरियासीस कुळातील घातक जिवाणू आढळून आले आहेत. त्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त जिवाणू बहुऔषधरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे जिवाणू सेफॅलोस्पोरिन, पेनिसिलिन, फ्लूरोक्विनोलोन्स आणि अगदी शेवटचा पर्याय मानल्या जाणाऱ्या कार्बपेनेम श्रेणीतील प्रतिरोधकांनाही दाद देत नाहीत. तसेच, सुमारे ७३ टक्क्यांपेक्षा जिवाणूंमध्ये ‘बायोफिल्म’ तयार करण्याची क्षमता आढळली. त्यामुळे प्रतिरोधकांचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नदीच्या पाण्यात जस्त, शिसे, तांबे, कॅडमियम, कोबाल्ट, आर्सेनिक आणि क्रोमियम यांसारख्या अत्यंत विषारी जड धातूंचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानकांपेक्षा खूप जास्त आढळले. म्हात्रे पूल आणि संगम पूल या ठिकाणी या प्रदूषणाची सर्वाधिक तीव्रता नोंदवली गेली. अभ्यासातील सांख्यिकीय विश्लेषणातून ‘को-सिलेक्शन’ची गंभीर बाब आढळून आली. त्यानुसार पाण्यात जड धातूंचे प्रमाण जितके जास्त, तितकी जिवाणूंमध्ये प्रतिरोधकांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढत असल्याचे दिसून आले. जड धातूंच्या सततच्या संपर्कामुळे प्रतिरोधके आणि धातू यांचा एकाच वेळी सामना करण्यासाठी जिवाणू सक्षम होतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मानवी आरोग्याला धोका
मूल्यांकनानुसार या दूषित पाण्याचा थेट संपर्क किंवा वापर झाल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुधारण्याची गरज
मुळा-मुठा नदीचे पाणी शेती आणि दैनंदिन कामांसाठीही वापरले जात असल्याने हे घातक जिवाणू आणि विषारी जड धातू थेट अन्नसाखळीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे नदीत सांडपाणी, रसायने सोडणे पूर्णपणे थांबवणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कार्यक्षमता तातडीने सुधारणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
नदी स्वच्छ राहण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना करण्यासाठी वस्तुस्थिती नेमकेपणाने समजणे महत्त्वाचे असते. त्यासाठी संशोधनातून प्रशासन आणि समाजाला दिशा मिळू शकते. – डॉ. विनय कुमार, संशोधक
